प्रभात रस्त्यावर कार्यालयात घुसून बिल्डरवर खुनी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

जमिनीच्या वादातून प्रभात रस्त्यावर बिल्डरच्या कार्यालयात घुसून दोघांनी कोयत्याने वार करून बिल्डरला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वकील महिलाही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

बिल्डर कृष्णा ऊर्फ बापू शेटे (वय ७२), नेहा नितीन जाधव (वय ४७) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अजित गणपत गोगावले (वय ४५, रा. मांजरी), अमित अरुण वाल्हेकर (वय ३१, रा. काळेवाडी) या दोघांना अटक केली आहे. नेहा जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

शेटे यांचे प्रभात रस्त्यावरील बुट्टे-पाटील क्लासिक इमारतीमध्ये कार्यालय आहे. भोर येथील एका जागेच्या व्यवहारावरून शेटे यांचे अजित गोगावले याच्यासोबत वाद सुरू होता. शेटे हे गोगावलेच्या मनाप्रमाणे व्यवहार करत नसल्याच्या रागातून अजित गोगावले हा त्याचा साथीदार अमित वाल्हेकर याच्यासोबत दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात गेला. शेटे यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वकील असलेल्या नेहा जाधव त्यांच्या मदतीला गेल्या असता, त्यांच्यावरही वार केल्याने त्यांचे करंगळीजवळचे बोट तुटले आहे. प्रभात रस्त्यावर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेटे आणि जाधव यांना रुग्णालयात दाखल केले. हा हल्ला या दोघांनी केल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अटक करण्यात आली, असे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले.