
हिंदुस्थानसाठी लोकशाहीवरील हल्ला सर्वात मोठा आहे, असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. कोलंबियातील ईआयए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे.
हिंदुस्थानमध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. या सर्वांनाच लोकशाही व्यवस्थेत स्थान मिळायला हवे. पण सध्या लोकशाही व्यवस्थेवर चारही बाजूंनी हल्ला होत आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी यांनी ऊर्जा संक्रमणाचा (Energy Transition) सिद्धांत मांडला. जेव्हा जेव्हा ऊर्जेत बदल होतो, तेव्हा तेव्हा नवीन साम्राज्ये उभी राहतात, असे राहुल गांधी म्हणाले. ब्रिटिशांनी वाफेचे इंजिन आणि कोळसा नियंत्रित केला आणि ते महासत्ता बनले. त्यानंतर अमेरिकेने कोळसा आणि वाफेवरून पेट्रोल आणि अंतर्गत ज्वलन इंजिनकडे होणारे संक्रमण यशस्वीरित्या हाताळले आणि ते महासत्ता बनले. आता आता आपण इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी नवीन संक्रमणाचा सामना करत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थान हा चीनचा शेजारी आणि अमेरिकेचा जवळचा भागीदार आहे. महासत्तांच्या शक्ती एकमेकांवर समोरासमोर येत असताना मध्यभागी आपण बसलो आहोत. आगामी 50 वर्षात हिंदुस्थान आणि चीनपैकी कोणता देश जगाचे नेतृत्व करताना दिसेल? असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, चीनबाबत मला माहिती नाही, पण हिंदुस्थान नक्कीच जगाचे नेतृत्व करू शकतो.
चीनपेक्षाही हिंदुस्थानची लोकसंख्या मोठी आहे. चीनच्या केंद्रीकृत व्यवस्थेऐवजी हिंदुस्थानची रचना विकेंद्रीकृत आणि विविधतापूर्ण आहे. हिंदुस्थानकडे एक प्राचीन आध्यात्मिक आणि वैचारिक परंपरा आहे, जी आजच्या आधुनिक जगासाठी उपयुक्त आहे. चीनप्रमाणे हिंदुस्थआन आपल्या लोकांचे दमन करू शकत नाही, असेही ते स्पष्ट म्हणाले.