भुयार यांच्यावरील गोळीबार व जाळपोळीची CBI चौकशी करा – हर्षवर्धन देशमुख

अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघात सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पार पडली. जिल्ह्यात सरासरी 59 टक्के मतदान झाले आहे. परंतु दोन घटमांमुळे मात्र मतदानाला गालबोट लागले आहे.

सोमवारी सकाळी वरुड मतदार संघात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार व गाडी जाळण्याची घटना घडली. यासह अमरावती मतदार संघात सकाळी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकमेकासमोर आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. एकंदरीतच जिल्ह्यातील या दोन घटनेमुळे मतदानाला गालबोट लागले.

सकाळी वाजताच्या दरम्यान स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार प्रचारासाठी निघाले असताना त्यांचे वाहन अज्ञात चार इसमांनी शेंदूर्जना घाट रोडवर अडविले व पेटवून दिले. यावेळी देवेंद्र भुयार यांनी आपल्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले. सदर घटना घडल्यानंतर राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली.

देवेंद्र भुयार हे आघाडी उमेदवार असल्यामुळे वरुडच्या घटनेला चांगलेच महत्व आले. या संदर्भात माजी कृषी मंत्री व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी वरुडमध्ये घडलेल्या कथीत गोळीबार व जाळपोळीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.

काँग्रेस-वंचितच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची
अमरावती विधानसभा मतदार संघात काँग्रेस व वंचितच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली. अमरावतीत भाजपचे डॉ. सुनिल देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या सुलभा खोडके यांच्यात थेट लढत आहे. मुस्लीम बहुल भागात मतदान सुरु असतानाच जमील कॉलनी येथे काँग्रेस व वंचित कार्यकर्त्यात वाद झाला. मात्र पोलिसांनी वेळीच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले व वाद मिटवला.

आपली प्रतिक्रिया द्या