मालवणात पोलिसांवर प्राणघातक हल्ला; एक पोलीस गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणात पोलीस पथकावर लोखंडी शिगा, कोयता आणि विटा घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वायरी लुडबेवाडी येथे घडली. यात हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण आणि इतर चार कर्मचारी जखमी झाले आहेत. मालवण शहरातील वायरी लुडबेवाडी येथील मोहन अनंत लुडबे आणि विवेक अनंत लुडबे या दोन भावांविरोधात नजीकच्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी चौकशी व पुढील तपासासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास टेंबुलकर आणि डी. व्ही. जानकर हे अर्जदारांना भेटायला गेले होते.

मोहन आणि विवेक यांनी अचानक तेथे येत पोलिसांवर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन हल्ला चढवला. यात हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर यांच्या डोक्यात वीट बसल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने मागवण्यात आली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण अन्य पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संशयित आरोपी मोहन लुडबे याने शिगा घेत त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी प्रसंगावधान राखत सिद्धेश चिपकर यांनी थेट मोहनच्या अंगावर उडी घेत त्याला पकडले. या झटापटीत सिद्धेश चिपकर जखमी झाले. अन्य पोलिसही जखमी झाले. अखेर मोहन आणि विवेक या दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्यात घरातील महिला सदस्यही पोलिसांवर हल्ला करण्यास पुढे आली होती, अशी माहिती सिद्धेश चिपकर यांनी दिली.

या हल्ल्यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस पथक जखमी झाले. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर, मंगेश माने, दिलीप खोत, जायभाय यांना दुखापती झाल्या आहेत. हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर याना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके घालण्यात आले आहेत. झटापटीत एका हल्लेखोरालाही दुखापत झाली असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. एकूणच या घटनेमुळे मालवणात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडूनही जखमी पोलिसांबाबतही माहिती घेतली. पोलिसांवर हल्ला झाल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जखमी पोलिसांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वाडीत दहशत
पोलिसांवर हल्ला केलेल्या लुडबे कुटुंबाची दहशत वाडीत आहे. कोयता, सळ्या घेऊन या कुटुंबातील सदस्य परिसरात फिरत असतात. यांची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. यापूर्वी दोनवेळा पोलीस कर्मचारी चौकशीस गेले असता त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटना आहेत. मात्र आता झालेला हल्ला गंभीर स्वरूपाचा आहे. एकूणच कुटुंबातील हल्लेखोर मनोरुग्ण असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.