
सामना प्रतिनिधी । जामखेड
संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष अवधुत पवार यांच्यावर शनिवारी दहा ते बारा जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात अवधुत पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामखेड येथील खाजगी रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवधुत पवार शनिवारी सायंकाळी शेतकरी मार्केटकडून खर्डा रोडने शहराकडे जात असताना या मार्गावरील लक्ष्मीआई चौकात 10 ते 12 जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली.हल्लेखोरांनी अवधुत पवार यांच्या पायावर पाठीवर डोक्यावर जबर मारहाण केली आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमी पवार यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती शहरभर पसरताच शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी तातडीने दवाखान्याकडे धाव घेत पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.


























































