
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दोन दिवसांपूर्वी रात्री उत्तर दरवाजातून काही तरुणांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. दरम्यान, खबरदारी म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पोलिसांकडे पत्राद्वारे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार शनिवारी, 13 मे रोजी रात्री 9 वाजून 41 मिनिटांच्या दरम्यान घडला. मंदिर बंद करण्याच्या वेळी उत्तर महाद्वार हे ट्रस्टच्या कर्मचाऱयांना बाहेर जाण्यासाठी थोडे उघडे ठेवलेले होते. तेव्हा काही तरुणांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवून आत येऊ दिले नाही. याबाबत 14 मे रोजी ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकाऱयांनी विश्वस्त मंडळाच्या सूचनेने पोलीस निरीक्षकांना पत्र दिले. त्यात शनिवारी घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. भविष्यात असे प्रकार घडू नयेत याची दक्षता घ्या, अशी विनंतीही केली आहे.
जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचा, तसेच त्र्यंबकेश्वर शहराच्या शांततेला बाधा आणण्याचा हा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी केली आहे.
तुषार भोसले यांच्या ट्विटमुळे तणाव
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रकाराबाबत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार आचार्य यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत ‘हमारे मंदिर में तुम्हारा क्या काम है’ असे ट्विट केले. हे ट्विट व्हायरल होऊन तणाव निर्माण झाला.


























































