आंबेगावात शालेय विद्यार्थिनीचा हात धरून स्प्रे मारण्याचा प्रयत्न

दोन महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलींना अडवून तोंडावर स्प्रे मारणे, सायकल काढून डोळ्यात मिरची पावडर टाकने या घटनेने अल्पवयीन मुलींमध्ये भीती निर्माण झाली असतानाच काल सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत चाललेल्या अल्पवयीन मुलीचा हात धरून स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शाळेत जाणाऱ्या मुली व पालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ही घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे घडली आहे. या गावातील ही तिसरी घटना आहे.

अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील दोन संख्या बहिणींना शुक्रवार दिनांक २४ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यालयात जात असताना मंचर शिरूर रस्त्यावर जुन्या बँक ऑफ बडोदा शाखेजवळ दोन मोटरसायकल स्वार विद्यालय जात असलेल्या मुलींजवळ आल्यावर मोटरसायकलवर बसलेला एक जण खाली उतरला. त्याने पाचवीत शिकत असलेल्या मुलीचा हात धरला.

हा प्रसंग पाहून आठवी इयत्तेत शिकणाऱ्या दुसऱ्या बहिणीने आपल्या बॅग मधील असलेली पाण्याची बॉटल हातात घेत मुलाच्या हातावर मारली. दोन्ही बहिणी मोठ्याने ओरडल्याने दोन्ही मोटर सायकल वर आलेले चौघेजण पळून गेले. मुली ओरडल्या नसत्या तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली व त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींना विद्यालयात पाठवावे का नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.

दरम्यान मंचर पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी अवसरी गावात येऊन विद्यार्थिनी व पालकांची भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची माहिती समजून घेतली. यावेळेस मांडगे म्हणाले विद्यालय चालू व बंद होण्याच्या वेळेत पोलीस पाठवून मुलींना संरक्षण दिले जाईल. कोणाला अज्ञात व्यक्ती माहिती असल्यास मंचर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.