अजय बारस्कर महाराज गद्दारच, सरकारचा दूत! आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; मराठा क्रांती मोर्चाचा हल्लाबोल

अजय ऊर्फ खंडू महाराज बारस्कर हेकेखोर आहे, खंडणी गोळा करणे, खोटं बोलणं, ब्लॅकमेलिंग करून आपली उपजीविका चालवण्यासाठी हा काही ना काही उद्योग करत असतो, असा हल्लाबोल करीत याच्या गद्दारीचा शिक्का आता पुसला जाणार नाही. याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे गजेंद्र दांगट, नीलेश सुंबे, विशाल घोलप यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, राज्य सरकारने बारस्करचा दूत म्हणून वापर करून मराठय़ांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अजय महाराज बारस्कर यांनी काल अजय जरांगे यांच्यावर आरोप केले होते. त्याला आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेत मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली.

अजय ऊर्फ खंडू बारस्कर हा महाराज नाही. याने नगरमध्ये एकही कीर्तन केलेले नाही. मात्र, समाजामध्ये विष पेरण्याचे काम त्याने सातत्याने केले. याचा चेहरा वेगळा असून, स्वतःची पोळी भाजण्यासाठी त्याने आतापर्यंत अनेक गोष्टी केल्या आहेत. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱयांची तक्रार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार त्याने केला आहे. समाजात याला काहीही किंमत नाही. मराठा क्रांती मोर्चावेळी त्याने केलेल्या प्रकारांची माहिती आम्ही जरांगे-पाटील यांना दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही त्याला बाजूला ठेवले आहे, असेही दांगट यांनी सांगितले.

‘संभाजी ब्रिगेड’मध्ये असतानाही अजय बारस्कर याने अशाच प्रकारचे कटकारस्थान केले होते. कटकारस्थान करणे हा त्याचा इतिहास असून, सुपाऱया घेण्याचे काम तो करतो, असा घणाघात नीलेश सुबे याने केला.

अजय बारस्कर हा महाराज नाहीच, तो नीच माणूस आहे. तो ज्या भागात राहतो तेथील एका अल्पवयीन मुलीला त्याने छेडले होते. त्यानंतर हातापाया पडून हा प्रकार त्याने मिटविला होता, असा आरोप विशाल घोलप यांनी केला.

…हा विकला गेला आहे

अजय महाराज हा जरांगे यांच्या टीममध्ये नव्हता, हे सगळ्यांना माहिती आहे. तो संघटनेच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये नव्हता. काहीतरी निमित्त काढून तो जरांगे यांना भेटायला जायचा.  सगळेच त्याला ओळखत होते, तर त्याला सारखी सारखी आपली ओळख का सांगावी लागली, असा सवाल करत हा विकला गेला आहे, असा आरोपही दांगट यांनी केला. मराठय़ांचे आंदोलन यशस्वी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने अजय महाराज याचा दूत म्हणून वापर केला. सरकारने जय महाराजांच्या रूपाने मराठय़ांनाच मराठय़ांच्या अंगावर सोडण्याचे पाप केले आहे, असा हल्लाबोल दांगट यांनी केला.

मराठय़ांच्या विरोधातील गद्दार

चार-पाच दिवसांपूर्वी अजय बारस्कर हा एका मोठय़ा नेत्याबरोबर हेलिकॉप्टरमधून आला होता. याचा तपास व्हायला पाहिजे. अजय बारस्कर याला सत्ताधाऱयांची साथ असल्यामुळे तो मराठा समाजाच्या विरोधात गेला असून, ‘मराठय़ांच्या विरोधातला गद्दार’, असा शिक्का त्याच्या कपाळावर बसला आहे. जर त्याला मराठय़ांबद्दल एवढाच कळवळा होता तर त्याने स्वतंत्र निर्णय घेऊन कधी आंदोलन केले आहे का, असा सवाल दांगट यांनी केला. अजय बारस्कर याच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे, असा आरोप दांगट यांनी केला.