पुण्याचे अतुल गायकवाड सिक्कीम क्रिकेट असोसिएशनच्या संचालक प्रशिक्षकपदी

बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे वरिष्ठ प्रशिक्षक असलेले पुण्याचे डॉ. अतुल गायकवाड यांची सिक्कीम क्रिकेट असोसिएशनच्या संचालक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अतुल गायकवाड हे सिक्कीम क्रिकेट असोसिएशन पुरुष संघ, असोसिएशनच्या महिला व पुरुष रणजी संघ यांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. ‘

सिक्कीम क्रिकेट असोसिएशनमधील सर्व वयोगटातील पुरुष व महिला खेळाडूंच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक त्या कार्यक्रमांची आखणी करणे, अंमलबजावणी करणे आणि त्यावर लक्ष ठेवणे याबरोबरच स्थानिक प्रशिक्षकांना प्रशिक्षित करणे, तरुण खेळाडूंसाठी आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करीत मार्गदर्शन करणे अशा सर्वच आघाडय़ांवर ते कार्यरत असणार आहेत.

मूळचे पुण्याचे असलेले डॉ. अतुल गायकवाड यांनी बीसीसीआयसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक आणि शिक्षण विभागाचे सह विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांना तब्बल 30 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव आहे. डॉ. अतुल गायकवाड हे एनएलपी सर्टिफाईड ट्रेनर असून प्रमाणित योग विज्ञान शिक्षकदेखील आहेत. सध्या इंग्लंड क्रिकेट बोर्डमधून ते स्वतः लेव्हल-4 मास्टर कोचचे प्रशिक्षण घेत असून ईसीबी लेव्हल-4 चे प्रशिक्षण घेणारे ते पहिलेच हिंदुस्थानी प्रशिक्षक ठरणार आहेत. हिंदुस्थानी महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि एनसीए येथे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या