सेलेब्रिटी चॉईस – बोलकी चित्रं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल तोडणकर

लहानपणापासून घरात वर्तमानपत्र वाचलं पाहिजेच हा आग्रह असायचा आणि या आग्रहापोटी मी करत असलेलं वाचन म्हणजे शेवटचं पान. क्रिकेटचं प्रचंड वेड असल्यामुळे इतर काही वाचलं नाही तरी या बातम्या मात्र मी आवर्जून वाचायचो. पुढे नाटय़क्षेत्रात आल्यापासून वाचनाची आवड लागली आणि ती रुजलीही. वाचन मग ते पुस्तक असो वा नाटकाचं स्क्रिप्ट यातून माझ्यातील कलाकार घडत गेला. माझ्या क्षेत्रातील दिग्गजांकडून नकळतपणे हे संस्कार होत गेले आणि निरीक्षणशक्ती अधिक व्यापक व्हावी यासाठी काय वाचायचं हेही कळू लागलं. यात सर्वप्रथम वाचलेली पुस्तकं म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे. पुलंची पुस्तकं नुसती वाचली जात नाहीत तर अनुभवली जातात. म्हणूनच त्यांचं कोणतंही पुस्तक कधीही हातात घ्यावं, त्यातलं कुठलंही पान उघडावं आणि डोळ्यांसमोर ती वल्ली साक्षात उभी राहावी असा अनुभव येतो. पुस्तकं माझ्यासाठी केवळ पुस्तकं नाहीत तर ती बोलकी चित्रं आहेत असं मला वाटतं.

प्रायोगिक नाटकं, चळवळीची नाटकं करताना त्या त्या विषयानुरूप खूप पुस्तकं वाचली. ललित, कथा, कादंबरी, आत्मचरित्र अशी सर्वच प्रकारची पुस्तकं वाचली. आपलं वैदिक साहित्य म्हणजे सामवेद अथर्ववेद, शाहीर विठ्ठल उमप यांचं फू बाई फू, सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र, शिवाजी सावंत यांचं श्रीमान योगी ही त्यातली काही आवडलेली आणि लक्षात राहिलेली पुस्तकं. याबरोबरच मी हिंदी साहित्य, हिंदी नाटकंही वाचली. मुझे चाँद चाहिए, आधे अधुरे ही नाटकं माझ्या आवडीची. इंग्रजी पुस्तकंही अधूनमधून सुरूच असतं. यातलं आवडलेलं आणि नुकतंच वाचलेलं पुस्तक म्हणजे अमिष त्रिपाठीचं सीता. वेगळ्या दृष्टिकोनातून सीतेचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे राहते.

माझं पहिलं दैवत म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यामुळे त्याचं आत्मचरित्रपर पुस्तक मी किती वेळा वाचलं असेल याची गणती नाही. हे पुस्तक दौऱयात कायम माझ्या जवळ असतं. या जोडीला इतर चार-पाच पुस्तकं मात्र कायम सोबत असतात. यात पुलंची पुस्तकंही हमखास असतातच. कवितासंग्रह वाचणं हा फार आवडीचा भाग नाही परंतु राजेश देशपांडे याचा पायरव काव्यसंग्रह आवडला. हा मार्मिक भाष्य करणाऱया या कविता आहेत. याचसोबत कायम वाचायला आवडणाऱया पुस्तकांत भाऊ पाध्येंच्या पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यांचं वासूनाका हे माझं अत्यंत आवडतं पुस्तक. सध्या मी हुसेन झैदी यांचं डोंगरी ते दुबई हे पुस्तक वाचतोय. एका वेगळ्या जगाचे दर्शन यानिमित्त होत आहे.
वाचायलाच हवं या स्वरूपाचं माझं आवडतं पुस्तक म्हणजे सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र ’सचिन तेंडुलकर प्लेइंग इट माय वे’. वयाच्या चौदाव्या वर्षी या मुलाला आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे कळतं आणि जगज्जेता म्हणून त्याचा प्रवास सुरू होतो. खूप काही शिकण्यासारखं, अनुभवण्यासारखं या पुस्तकात आहे. वाचन तुम्हाला जगायला शिकवतं, तुम्हाला स्वतची ओळख करून देतं ही वाक्यं नेहमी आपल्या कानावर पडतात, पण त्याचा खरा अर्थ एखादं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला येणाऱया अनुभवातूनच कळतो.

शब्दांकन : शुभांगी बागडे