
हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ संस्थानच्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 21 लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच औंढा येथील ५ हजार कुटुंबांना १७ लाख रुपयांच्या अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख व श्री औंढा नागनाथ मंदिर संस्थानच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष संतोष बांगर यांनी दिली आहे.
औंढा नागनाथ येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिर्लिंग संस्थानच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यासह गजानन वाखारकर, डॉ. पुरुषोत्तम देव, गणेश देशमुख, डॉ. खरात, आनंद निलावार हे विश्वस्त व सल्लागार समिती सदस्य तसेच राम कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोरोना या महामारीवर उपाययोजना करण्यासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला एकवीस लाख रुपये, तर औंढा येथील गोरगरीब लोकांना मदत म्हणून सतरा लाख रुपयांचे अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्याचे 5 हजार किट बनवून वाटण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली. गरीब व गरजू कुटुंबियांना 5 किलो पीठ, 1 किलो तूरडाळ, 2 किलो साखर, 5 किलो तांदूळ, 1 लीटर तेल, 250 ग्राम मिर्ची, 1 किलो मीठ, 100 ग्राम चहापत्ती, 1 डेटॉल साबण, यासह इतर काही अत्यावश्यक साहित्य दिले जाणार असल्याचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.





























































