संभाजीनगरामध्ये कोरोनाचे दहा पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

1696

संभाजीनगरामध्ये घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सह्याद्रीनगरातील 58 वर्षीय कोरोनाबाधिताचा आज रविवारी मृत्यू झाला. तर शहरातील अन्य सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच संभाजीनागरातील कोरोनाबाधितांची संख्या आता दहावर पोहोचली आहे अशी माहिती नोडल ऑफिसर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. मराठवाड्याची राजधानीत आता कोरोनाचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील सह्याद्रीनगर येथील रहिवासी व मुंबई येथील एका बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेला 58 वर्षीय व्यक्ती पंधरा दिवसांपूर्वी शहरात परतला होता. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने शुक्रवारी तो रुग्ण घाटीत उपचारासाठी दाखल झाला. प्रवास हिस्ट्री तपासल्यानंतर त्याला घाटीच्या सीव्हीटीएस विभागातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याचा स्वॅब घेण्यात आला. रविवारी सकाळी स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. त्यावेळी त्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर आरटी ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. मात्र, अवघ्या काही तासांतच दुपारी साडेबारा वाजता उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

घाटीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्याचबरोबर जलाल कॉलनी हिमायतनगर येथील 79 वर्षीय वृद्धाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला घाटीतून चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

आणखी सात रुग्ण पॉझिटिव्ह

गुरुवारी सिडको एन-फोर येथील 59 वर्षीय महिलेला व आरेफ कॉलनी येथील 39 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. तर रविवारी आणखी सात संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे रुग्ण रोशनगेट, पदमपुरा, किराडपुरा, जलाल कॉलनी, आरेफ कॉलनी आणि सातारा देवळाई परिसरातील आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने पाचही वसाहतींमधील संबंधित रुग्णांच्या घरांशेजारचा शंभर मिटरचा परिसर तातडीने सील केला.

जॉर्डनहून परतलेला पॉझिटिव्ह

शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोनजणांना कोराेनाची लागण झाली आहे. यामध्ये रोशनगेट येथे राहणारा 37 वर्षीय तरुण असून, 15 दिवसांपूर्वीच तो जॉर्डन येथून परतला होता, तर पदमपुरा येथील 43 वर्षीय व्यक्तीला कोराेनाची लागण झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या