संभाजीनगर – गुलमंडी, पैठणगेट रस्त्यावर लवकरच पादचारी मार्ग

गुलमंडी ,पैठणगेट आणि कॅनॉट प्लेस या गर्दीच्या ठिकाण पादचारी मार्ग करण्याच्या दिशेने सुक्ष्म नियोजन करण्यात यावे अशी सूचना मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी केली.

मनपाने झोन निहाय पार्किंग झोन अंतिम करण्यासाठी तांत्रिक सल्लागार आणि तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. या समितीची बैठक आज गुरुवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख, उपायुक्त अपर्णा थेटे, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुरेश वानखेडे आदी उपस्थित होते. या बैठकीत पार्किंग झोन अंतिम करण्यावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने गुलमंडी, पैठणगेट, संभाजीपेठ, कॅनॉट प्लेस आणि निराला बाजार या गर्दीच्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा निर्माण करण्यावर चर्चा झाली. या बैठकीपूर्वी समितीच्या सदस्यांनी वरद गणेश मंदिर ते संभाजीपेठ-निराला बाजार मार्गे या रस्त्याची पायी फिरून सर्वेक्षण केले

या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थेचे नियोजन होईल

– सावरकर चौकाजवळील निर्माण भारतीच्या पाठीमागे मनपाची मोकळी जागा असून त्या जागेवर पार्किंग झोन करता येईल.
– निराला बाजार येथे एम. पी. लॉ कॉलेज समोर दुकाने, हॉटेलसाठी पार्किंगची जागा दिली आहे. त्यांच्याशी चर्चा करुन वाहने पार्किंगसाठी दिलेल्या जागेवरच वाहने पार्किंग करण्यात यावेत.
– बाबुराव काळे चौक (निराला बाजार ) ते संभाजीपेठ या रस्त्यावर छोटे मोठे अडथळे आहे. त्यात बंद अवस्थेतील बस स्टॉप, महावितरणच्या डीपी, नर्सरी याचा समावेश असून हे हटविल्यानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्किंगसाठी मुबलक जागा मिळेल.
– निराला बाजार येथील मोतीवाला कॉम्प्लेक्स समोरील जागेवर व्यवस्थित नियोजन केल्यावर वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल.
– जाफर गेट येथे आठवडी बाजाराची जागा बाजाराचा दिवस सोडून ट्रक आणि इतर जड वाहनांची पार्किंगसाठी वापरणे योग्य राहील.
– या परिसरातील मनपाची बंद पडलेली शाळा भुईसपाट करून वाहनतळसाठी जागा निर्माण होऊ शकते.
समितीच्या सदस्यांना प्रशासकांची सूचना
– यावर निर्णय घेण्यापूर्वी स्थळ पाहणी करण्याची सूचना प्रशासकांनी केली.
– संबधित व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील कारवाई करण्यात यावी अशी सूचना पाण्डेय यांनी केली.
– तसेच इतर मनपाच्या पार्किंग पॉलिसीचा अभ्यास समितीने करावा अशी सूचना केली.

आपली प्रतिक्रिया द्या