संभाजीनगरात विवाह सोहळयासाठी महापालिकेची परवानगी अनिवार्य

प्रातिनिधिक फोटो

कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी सर्वच नियम कडक केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने आता लग्नकार्यासाठी 50 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई केली आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरासाठी आदेश जारी करताना लग्नसमारंभाकरिता मनपाची परवानगी बंधनकारक केली आहे. तसेच पोलीस ठाण्याचीही परवानगी अनिवार्य आहे. लग्नकार्यात नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा देखील दाखल केला जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

राज्य सरकारने राज्यभरात लग्नकार्यासाठी दोनशे व्यक्तींना परवानगी दिली आहे. मात्र आता केंद्रांच्या सुधारित आदेशानुसार लग्नकार्यासाठी केवळ 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने करावी, असेही केंद्राने सूचित केले आहे. त्यानुसार मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी आदेश जारी केले आहे. हे आदेश 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

या आदेशानुसार सार्वजनिक व खासगी कार्यक्रमांसाठी बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र लग्नकार्यासाठी 50 पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येणार नाही, याची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याचे मंगल कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे. मंगल कार्यालय चालकांनी दरवाजे व खिडक्या उघडया ठेवाव्यात, नॉन एसी हॉलचा वापर करावा. तसेच मंगल कार्य करण्यापूर्वी त्या त्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाणे व मनपाच्या प्रभाग कार्यालयाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मंगल कार्यालयात तोंडाला मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, कार्यालय परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगसाठी दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे अशा सूचनाही आदेशात केल्या आहेत.

नियमांचे पालन न केल्यास कारवाई

मंगल कार्यालयांनी नियमांचे पालन न केल्यास सुरूवातीला दंडात्मक कारवाई केली जाईल. मंगल कार्यालयात प्रथम वेळेस मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड. दुसऱ्यांदा केलेल्या तपासणीत तोंडाला मास्क न दिसल्यास दुकान व मंगल कार्यालयास सात दिवसांसाठी सील केले जाईल. त्यानंतरही दुकान व मंगल कार्यालयात विनामास्क आढळल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असेही प्रशासक पाण्डेय यांनी आदेशात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या