
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यापासून आजारी असलेला पांढरा वाघ सचिन ने अखेर शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्राण सोडले. सचिनवर रविवारी सकाळी ९ वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचे प्राणी संग्रहालयाचे प्रभारी संचालक विजय पाटील यांनी सांगितले. सचिनच्या निधनाचे वृत्त कळताच महापौर नंदकुमार घोडेले, उद्यान विभाग प्रमुख वसंत निकम यांनी भेट दिली.
सिध्दार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील शाम आणि सिता या पांढर्या वाघाच्या दांपत्यापासून सचिनचा जन्म झाला. सिता ने १८ जानेवारी २००४ रोजी सचिनला जन्म दिला. सचिन १८ जानेवारीला १५ वर्ष पूर्ण करणार होता. परंतु गेल्या सहा महिन्यापासून तो आजारी पडला होता. सप्टेंबर महिन्यात सचिनची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्यामुळे त्यास सलाईन देण्यात आली होती. पिजंर्यात एकाच जागेवर पडून राहिल्यामुळे सचिनला बेडसूल झाले होते. त्याचा आजार पाहून मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तातडीने पूणे मनपातील पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शन घेऊन त्याच्यावर उपचार सूरू केले. उपचार सूरू असताना सचिनला अर्धांगवायू झाला. त्यामुळे त्याची हालचाल पूर्णपणे थांबली. तरीही तो अन्न घेत होता. पिजंर्यातून डरकाळी फोडत होता.
सप्टेंबर ते डिसेबर या चार महिन्यात त्याचा आजार बळावत गेला. त्याच्यावर मनपाच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नितू सिंग या उपचार करीत होत्या. दोन दिवसापासून त्याने अन्नपाणी सोडले होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजता सचिनने प्राण सोडला. मृत्यू समयी तो १५ वर्षाचा होता. रविवारी सचिनचे वन विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून सकाळी ९ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत त्याच्यावर अत्यंसस्कार करण्यात येणार आहे.
प्राणिसंग्रहालयात आता ११ वाघ
प्राणिसंग्रहालयात आता ७ पिवळया पट्टयाचे, एक पांढरा पट्टयाचा असे ८ वाघ आणि ३ बिबटे आहेत. त्यापैकी ३ पिवळया पट्टयाच्या मादी वाघ असून २ बिबटया मादी आहेत. या वाघांची तब्येत अत्यंत चांगली असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी संचालक विजय पाटील यांनी दिली.
प्रमोद, भानुप्रियाची तिसरी पिढी
प्राणिसंग्रहालयात १९९५ ला महापालिकेने प्रमोद व भानुप्रिया ही पांढर्या वाघाची जोडी आणली होती. त्यांच्या पोटी शामू व सीता या दोघांचा जन्म झाला होता. १८ जानेवारी २००४ ला त्यांच्या पोटी सचिनचा जन्म झाला होता. प्राणिसंग्रहालयात आता एकच पांढरा वाघ आहे.


























































