हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर ललित बाबू, नीलोत्पल दास आघाडीवर

हिंदुस्थानचे ग्रॅण्डमास्टर ललित बाबू, नीलोत्पल दास यांनी आठव्या फेरीमध्ये विजय मिळवत ऑरियनप्रो मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर घरिब्यान मामीकोन यांच्यासह संयुक्तरित्या आघाडी घेतली.
वर्ल्ड सेंटर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ग्रॅण्डमास्टर विभागात ललित बाबूने पांढऱया मोहऱयांनिशी खेळताना ग्रॅण्डमास्टर अलेक्सी फेडोरोव्हचा 39 चालींमध्ये पराभव केला. नीलोप्तलने इंटरनॅशनल मास्टर आर्सेन दावत्यान याच्यावर विजय मिळवला.  मामीकोनने स्पर्धेतील सर्वोत्तम विजय नोंदवताना ग्रॅण्डमास्टर अलेक्सेज अलेक्झांड्रोव्ह याच्याविरुद्ध काळ्या मोहऱयांनिशी खेळताना 8 डावांतून 7 गुणांसह अव्वल खेळाडूंमध्ये आपले स्थान राखले.
ग्रॅण्डमास्टर अलेक्झांड्रोव्ह, अलेक्झांड्रोव्ह, ग्रॅण्डमास्टर लेवन पंतसुलिया, ग्रॅण्डमास्टर मॅन्युएल पेट्रोस्यान, ग्रॅण्डमास्टर दीपन चक्रवर्ती आणि ग्रॅण्डमास्टर गुयेन डक होआ यांच्यासह 9 खेळाडू 6.5 गुणांसह दुसऱया स्थानी आहेत.
ज्युनियर विभागात एफएम अंश नेरुरकरने सीएम माधवेंद्र शर्मावर विजय मिळवत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. अन्य बोर्डवर सीएम मधेश कुमारने अद्विक अग्रवालला बरोबरीत रोखले. अंश आणि मधेश यांनी 7 गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे. सीएम व्योम मल्होत्रा, अद्विक अग्रवाल आणि शौनक बडोले यांनी 6.5 गुणांसह दुसरे स्थान राखत दावेदारी कायम राखली आहे.