निकृष्ट बांधकामामुळे औसा पंचायत समितीच्या नूतन वास्तुची दूरवस्था

5

सामना प्रतिनिधी । औसा

कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या औसा पंचायत समितीच्या नूतन वास्तूचे बांधकाम निकृष्ट असल्यामुळे लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच वास्तूची दूरवस्था झाली आहे. औसा तालुका पंचायत समितीचा कारभार सुरळीत करता यावा म्हणून भव्य-दिव्य इमारतीचा कृती आराखडा तयार करून इमारत उभारण्यात आली. इमारत तयार झाल्यानंतर वर्ष-दीड वर्ष लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत होती. चार महिन्यांपूर्वी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बसवराज पाटील, आमदार सुरेश धस, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर आदी मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटात नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा झाला. मात्र, चार महिने उलटल्यानंतर इमारतीचे दरवाजे निघत असून इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने इमारतीची दूरवस्था झाली आहे.

लातूर येथील एका एजन्सीला हे काम देण्यात आले होते. संबंधीत एजन्सीने बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने इमारतीचे दरवाजे गळून पडत आहेत. या इमारतीतील फरशा व्यवस्थीत बसविण्यात आल्या नसल्याने फरशा खालीवर होत आहेत. फरशी बसविताना लेव्हल केली नसल्याने फरशा हालत आहेत. नरेगा कक्षाची ग्रेनाईटची दारे गळून पडत आहेत. या इमारतीसाठी राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून देण्यात आला. ग्रामीण भागातून शेकडो गावातील नागरिक पंचायत समितीमध्ये दैनंदीन कामकाजासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात. परंतु नरेगा कक्षातील दोन दरवाजाच्या ग्रेनाईटच्या फरशा फुटून जमिनीवर खच पडला आहे. सभापती कॅबीनकडे जाताना फरशा हलत आहेत. इमारतीच्या परिसरात अनेक गैरसोयी आहेत. इमारतीच्या पाठीमागील भागात दगड गोटे, मुरुम अस्ताव्यस्त पडल्याने घाण साचली आहे. तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा नाही. फक्त कार्यालयाच्या इमारतीत कर्मचारी वर्गासाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. वाहनांची पार्किंग करण्यासाठीची सुविधा नसल्याने मनमानी पद्धतीने वाहने उभी करण्यात येत आहेत. तसेच पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून अतिक्रमणाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. दिवसा पंचायत समिती इमारती समोरील मैदानात खाजगी वाहने उभी केली जातात. पंचायत समितीच्या इमारतीची उभारणी करीत असताना कर्मचारी व बाहेरगांवहून येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंग व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही.

पंचायत समितीच्या पाठीमागील परिसरात घाण साचली असून या परिसरातील दगड गोटे काढून मागील बाजू स्वच्छ करणे व त्या जागेत वृक्ष लागवड करून परिसराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंचायत समितीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या एजन्सीने निकृष्ट काम केले कसे ? निकृष्ट बांधकाम असताना बिल कसे देण्यात आले? लोकार्पण सोहळा होऊन चार महिने होत नाही तोच इमारतीची दूरवस्था झाली आहे. या प्रकरणी दोषींची सखोल चौकशी करून दोषींवर औसा पंचायत समिती कोणती कार्यवाही करणार असा सवाल उपस्थित होत आहे.