हिंदुस्थान महिला संघाने वन डेतील दारुण अपयशानंतर टी-20 मालिकेत धमाकेदार सुरुवात करताना पहिला सामना जिंकला होता. पण ऑस्ट्रेलियन्स महिलांनी दुसरा सामना जिंकत बरोबरी साधली होती, तर आज तिसऱया सामन्यातही 7 विकेट आणि 8 चेंडू राखून सामना जिंकला आणि मालिकाही 2-1 ने जिंकली.
हिंदुस्थानच्या 148 धावांच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियाने हसतखेळत गाठले. ऑलिसा हिली (55) आणि बेथ मुनी (नाबाद 52) यांनी दिलेल्या 85 धावांच्या सलामीने सामनाच एकतर्फी केला. दोघींनीही वैयक्तिक अर्धशतके झळकावली. हिली बाद झाल्यावर मुनीने विजयी लक्ष्य 19 व्या षटकांतच गाठले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात हिंदुस्थानी गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरल्या. मालिकेत सर्वाधिक 89 धावा करत हिली मालिकेत सर्वोत्तम ठरली, तर 12 धावांत 2 विकेट टिपणारी अॅनाबेल सदरलॅण्ड सामन्याची मानकरी ठरली. त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक हिंदुस्थानला फलंदाजी दिली. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 39 धावांची समाधानकारक सुरुवात करून दिली. शेफालीने 17 चेंडूंत 6 चौकारांसह 26 धावा ठोकल्या, तर स्मृतीने 29 धावा चोपून काढल्या. त्यानंतर सदरलॅण्डने जेमिमा रॉड्रिग्ज (2) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (3) यांना सलग षटकांत बाद करून हिंदुस्थानच्या धावांच्या वेगाला रोखले. मात्र रिचा घोषने 34 धावांची आक्रमक खेळी करत संघाला 147 धावांपर्यंत नेले होते.