त्याच वेगवान गोलंदाजांना सतत खेळवणे ही घोडचूकच! इयान चॅपेल गुरुजींनी टोचले कांगारूंचे कान

चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली.

कसोटी सामन्यात त्याच चार वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळणे ही ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी चूक होती. वेगवान गोलंदाजांनी पाच आठवडय़ांत चार कसोटी सामने खेळणे म्हणजे चार मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासारखे आहे. सिडनीत मिचेल स्टार्कच्या बाबतीत ती गोष्ट जाणवली. या घोडचुकीमुळे स्वतःच्या घरात वातावरण अनुकूल असताना बलाढय़ गणल्या जाणाऱया ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी मालिकेत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी कांगारूंच्या संघव्यवस्थापनाचे कान टोचले आहेत.

नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील टीम इंडियाच्या  विजयाचे  आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे  क्रिकेटतज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने  विश्लेषण सुरू आहे. या मालिकेत हिंदुस्थानी  संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्टय़ा, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल  होते.

पण युवा हिंदुस्थानी संघाने जिद्दीच्या बळावर बलाढय़ ऑस्ट्रेलियाला  पराभवाची धूळ चारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूंनी आपल्या संघव्यवस्थापनावर टीकेची झोड उठवली आहे.

दुखापती टीम इंडियाला वरदान ठरल्या 

दुखापती या टीम इंडियासाठी वरदान ठरल्या. त्यामुळे प्रत्येक कसोटीत हिंदुस्थानी संघाला नव्या, ताज्या दमाच्या खेळाडूंचा समावेश करावा लागला. यजमान ऑस्ट्रेलियाने  बिलकूल त्याउलट  केले. ऑस्ट्रेलिया चारही कसोटी सामन्यांत त्याच चार गोलंदाजांना घेऊन खेळली. त्यामुळे मालिकेच्या अखेरीस ते थकले होते. त्यांची दमछाक झाली, असे विश्लेषण इयान चॅपेल यांनी आपल्या ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मधील  स्तंभात केले आहे.

ते म्हणाले, पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. त्यानंतर चौथ्या कसोटीत दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी हे प्रमुख खेळाडू संघाबाहेर होते. खरेतर दुखापतीमुळे हिंदुस्थानी संघाची बाजू सुरुवातीला कमकुवत वाटली होती. पण संघात समावेश झालेल्या युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे या कामगिरीबद्दल टीम इंडियाचे युवा खेळाडू निश्चितच कौतुकाला पात्र आहेत, असे चॅपेल यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या