गतविजेता ऑस्ट्रेलिया गारद, 27 वर्षांनंतर इंग्लंड फायनलमध्ये

33

सामना प्रतिनिधी । बर्मिंगहॅम

ख्रिस वोक्स, जोर्फा आर्चर, अदिल रशीदची प्रभावी गोलंदाजी, जेसन रॉयचे धडाकेबाज अर्धशतक अन् जो रूट व ओएन मॉर्गनच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंड संघाने गुरुवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला 8 गडी व 107 चेंडू राखून धूळ चारली आणि तब्बल 27 वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता येत्या रविवारी होणार्‍या अंतिम फेरीत इंग्लंडसमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. हिंदुस्थाननंतर ऑस्ट्रेलिया या गतचॅम्पियनला बाहेरचा रस्ता पकडावा लागल्यामुळे आता जगाला नवा जगज्जेता मिळणार हे निश्चित झाले आहे. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यापैकी एकानेही एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाहीए. अवघ्या 20 धावा देऊन तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणार्‍या ख्रिस वोक्सची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.  

फलंदाज सुसाट

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 224 धावांचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडने दोन गडी गमावून विजयी लक्ष्य ओलांडले. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टॉ जोडीने 124 धावांची भागीदारी करीत कांगारूंचे मनसुबे उधळून लावले. मिचेल स्टार्कने जॉनी बेअरस्टॉला 34 धावांवर बाद करीत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बळी गारद करण्याच्या ग्लेन मॅग्राच्या विक्रमाला मागे टाकले. त्याने 27 फलंदाज बाद केले. जेसन रॉय 85 धावांवर बाद झाला. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. मात्र चेंडूने त्याच्या बॅटला स्पर्श केला नसल्याचे रिप्लेमध्ये दिसले. त्यानंतर जो रूट (नाबाद 49 धावा) व ओएन मार्गन (नाबाद 45 धावा) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.  

स्मिथ लढला अन् रक्तबंबाळ कॅरीची झुंज

ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 14 धावा अशी झाली असतानाच स्टीवन स्मिथ व ऍलेक्स कॅरी या जोडीने 103 धावांची शानदार भागीदारी करीत डाव सावरला. जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू ऍलेक्स कॅरीच्या हनुवटीवर आदळला. यानंतर रक्तबंबाळ झाल्यानंतरही त्याने बॅण्डेज लावून पुढे खेळण्याचा निर्णय घेतला. अखेर अदिल रशीदच्या गोलंदाजीवर तो 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर स्टीवन स्मिथने 85 धावांची खेळी करीत कांगारूंना दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. या खेळीत त्याने सहा चौकार मारले. ग्लेन मॅक्सवेलने 22, तर मिचेल स्टार्कने 29 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स व अदिल रशीद यांनी प्रत्येकी 3 तर जोफ्रा आर्चरने 2 फलंदाज बाद केले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर त्यांच्या मनासारखे काहीही झाले नाही. जोफ्रा आर्चरने कर्णधार ऍरोन फिंचला शून्यावरच पायचीत पकडले आणि कांगारूंना हादरा दिला. त्यानंतर ख्रिस वोक्सने डेव्हिड वॉर्नरला (9 धावा) जॉनी बेअरस्टॉकरवी झेलबाद केले व पहिलाच सामना खेळणार्‍या पीटर हॅण्डस्कोम्बची (4 धावा) दांडी उडवली.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ धावचीत 85, ऍलेक्स कॅरी झे विन्स (बदली खेळाडू) गो. रशीद 46, मॅक्सवेल झे. मॉर्गन गो. आर्चर 22, स्टार्क झे. बटलर गो. वोक्स 29. अवांतर : 16. एकूण : 49 षटकांत सर्व बाद 229. गोलंदाजी : वोक्स 8-0-20-3, आर्चर 10-0-32-2, रशीद 10-0-54-3.

इंग्लंड  : रॉय झे. कॅरी गो. कमिन्स 85, रूट नाबाद 49, मॉर्गन नाबाद 45. अवांतर : 13. एकूण : 32.1 षटकांत 2 बाद 226. गोलंदाजी : स्टार्क 9-0-70-1, कमिन्स 7-0-34-1.

विजयी संघ : इंग्लंड 

आपली प्रतिक्रिया द्या