
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला गेली काही वर्षे धक्के बसत असली तरी आता त्यांचा संघ पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झालाय. बुधवारपासून सुरू होणाऱया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त ते दक्षिण आफ्रिकेला चिरडून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरतील, असे भाकीत क्रिकेट दिग्गजांनी आधीच वर्तवले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी संघाला सलग तिसऱयांदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 या दारुण अपयशाने हिंदुस्थानचे आव्हान अडचणीत आणले आणि मग ऑस्ट्रेलियाने 3-1 अशी मात करत हिंदुस्थानचे आव्हान संपवले. गेल्या अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 209 धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्यात हिंदुस्थान अंतिम फेरीत खेळत असला तरी कसोटीवर वर्चस्व गाजवले ते ऑस्ट्रेलियानेच. आता तेच जेतेपद ऑस्ट्रेलिया सहज राखेल, असे अंदाज नसून गेल्या दोन वर्षांतील ऑस्ट्रेलियाचा खेळच सांगतोय.
सलग सात विजय
ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारताना एकदाही सलग पाचही विजय नोंदविलेले नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग सात विजयांची नोंद करत अंतिम फेरी गाठली. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध प्रोव्हिडन्स कसोटीत विजय मिळवला आणि त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग तिन्ही मालिकांत 2-0 अशा विजयांची नोंद करत मालिका विजयाची अनोखी हॅटट्रिक साजरी केली. ही एक बाब सोडली तर दक्षिण आफ्रिका संघ हा ऑस्ट्रेलियासमोर कमकुवत भासतोय.
ऑस्ट्रेलियाचाच दबदबा
गेल्या दोन वर्षांत ऑस्ट्रेलियाने सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटल्यानंतरही ‘ऍशेस’ आपल्याकडेच राखली. मग पाकिस्तानला हरवले. न्यूझीलंडवर मात केली. हिंदुस्थानलाही 3-1 ने नमवत कसोटीत आपलेच राज्य असल्याचे अवघ्या जगाला दाखवले. यादरम्यान ते वेस्ट इंडीजविरुद्ध एका कसोटीत हरले. हा त्यांच्यासाठी फार मोठा धक्का होता. पण हा एक सामना सोडला तर ऑस्ट्रेलियाने पूर्ण मोसम गाजवला. विशेष म्हणजे ते बलाढय़ संघांवर मात करत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. याउलट दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास दुबळ्या संघांना नमवत केला आहे. गेल्या वर्षी त्यांना न्यूझीलंडकडून 2-0 अशी हार सहन करावी लागली होती. मात्र त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडीज, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या तळाला असलेल्या संघांना सलग धक्के देत चांगल्या गुणांची कमाई केली आणि अंतिम फेरी गाठली. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियाची झुंज अव्वल संघांशी पडली आणि त्यांनी त्यांच्यावर मात केली तर दक्षिण आफ्रिका कमकुवत संघांविरुद्ध विजय मिळवत हिंदुस्थानला मागे टाकत लॉर्ड्सपर्यंत पोहोचला.
चार गोलंदाज ऑस्ट्रेलियाची ताकद
दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच दृष्टीने सरस आहे. त्यांची फलंदाजी, त्यांचे क्षेत्ररक्षण नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत, पण त्यांची गोलंदाजी सर्वात जबरदस्त ठरतेय. कारण त्यांच्याकडे 1500 कसोटी विकेट टिपणारे मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन हे मॅचविनर गोलंदाज आहेत. हीच ताकद ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा जगज्जेतेपदाचा किताब जिंकून देण्यास पुरेशी ठरणार, यात वाद नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलॅण्ड, अॅलेक्स, कॅमरून ग्रीन, जॉश हेझलवूड, ट्रव्हिस हेड, जॉश इंगलिस (यष्टिरक्षक), उस्मान ख्वाजा, सॅम कॉनस्टास, मॅथ्यू कुहनमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टिव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू बेवस्टर.
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बवुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहम. कॉर्बिन बॉश, टॉनी डे झॉर्जी, मार्को यान्सन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, कगिसो रबाडा, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्ज, कायल वेरेन.





























































