ऑस्ट्रेलियात अग्नितांडव; 500,000,000 पशुपक्ष्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या महाभयंकर आगडोंबाने तब्बल 50 कोटींहून अधिक पशुपक्ष्यांचा बळी घेतला आहे. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने मनुष्यहानी नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. मात्र पशुपक्ष्यांची होरपळ थांबवण्याकामी प्रशासन हतबल झाले आहे. आगीत पशुपक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट झाल्याने जगभरात हळहळ व्यक्त होत आहे.

दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात हा महाभयंकर आगडोंब उसळला आहे. यात दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात आतापर्यंत 14 हजार हेक्टर जंगल क्षेत्र नष्ट झाले आहे. तसेच व्हिक्टोरियात 82 हजार हेक्टरवरील जंगलाचा कोळसा झाला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 50 कोटींहून अधिक पशुपक्षी होरपळून मरण पावले. यात हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. दरम्यान, आगीत आतापर्यंत 23 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला असून मनुष्यहानीही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी हिंदुस्थान दौरा केला रद्द

आगीच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हिंदुस्थानातील चार दिवसांचा नियोजित दौरा रद्द केला. ते 13 जानेवारीला हिंदुस्थानात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार होते. आमचा देश महाभयंकर आगीत होरपळत आहे. अशा स्थितीत नागरिकांना मदत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केले.

हजारो घरे बेचिराख, अनेक भागांत आणीबाणी

आगीत हजारो घरे बेचिराख झाली आहेत. गेल्या आठवडाभरातच 200हून अधिक घरे जळून खाक झाली. आग लागलेल्या परिसरातील 70 टक्के लोकांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अनेक भागांत आणीबाणी घोषित केली आहे, तसेच अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद केली आहे. आगीचा सर्वाधिक फटका व्हिक्टोरियाला बसला असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना या भागातून बाहेर काढले जात आहे.