
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघावर 232 धावांनी ‘महाविजय’ संपादन करीत वन डे क्रिकेटमधील सलग 21 विजयांच्या विक्रमाची बरोबरी साधली. रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने 2003 साली हा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. ऑस्ट्रेलियन संघाने सलग तीन सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाच्याच रचेल हेन्स हिची ‘प्लेअर ऑफ दी मॅच’ व ‘प्लेअर ऑफ दी सीरिज’ म्हणून निवड करण्यात आली.
रचेल हेन्सने 96 धावांची, तर एलिसा हिलीने 87 धावांची खेळी साकारल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱया ऑस्ट्रेलियाला 325 धावा करता आल्या. 326 धावांचा पाठलाग करणाऱया न्यूझीलंडचा डाव 27 षटकांतच 93 धावांमध्ये गडगडला. मेगन शूट, जेस जॉनासेन, अॅश्ले गार्डनर व सोफी मोलीन्यूएक्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विक्रमी टप्पा
– हिंदुस्थान (3-0)
– पाकिस्तान (3-0)
– न्यूझीलंड (3-0)
– इंग्लंड (3-0)
– वेस्ट इंडीज (3-0)
– श्रीलंका (3-0)
– न्यूझीलंड (3-0)
वन डे क्रिकेटमध्ये सलग मिळवलेल्या विजयांचा कालावधी
-ऑस्ट्रेलिया (पुरुष) – 2003
– ऑस्ट्रेलिया (महिला) – 2018 ते 2020
या चार खेळाडू ठरल्या 21 सामन्यांच्या साक्षीदार
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने संस्मरणीय कामगिरी केली. या देदीप्यमान 21 विजयांचे साक्षीदार होण्याचा मान चार क्रिकेटपटूंना लाभला. बेथ मुनी, एलीसा हिली, अॅश्ले गार्डनर व रचेल हेन्स या चार खेळाडूंनी विक्रमी 21 लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले हे विशेष.



























































