हिंदुस्थानने स्वतःच्याच लोकांविरुद्ध युद्ध छेडलंय! लेखिका अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

‘1947 साली देश स्वतंत्र झाल्यापासून हिंदुस्थान सरकारने आपल्याच देशातील लोकांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. पाकिस्ताननेही कधी असे केले नाही,’ असा दावा ‘बुकर’ पुरस्कार विजेत्या प्रख्यात लेखिका अरुधती रॉय यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या वक्तव्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘हिंदुस्थान सरकारने कश्मीर, मणिपूर, नागालँड, मिझोरम, तेलंगणा, पंजाब, गोवा, हैदराबादमध्ये आपल्याच लोकांच्या विरोधात लष्कराला उभे केले आहे. पाकिस्ताननेही कधी असे केले नाही. पण लोकशाही देश असलेल्या हिंदुस्थानने हे केले आहे, असे त्या म्हणाल्या.

उच्चवर्णीय हिंदू सरकारने लादलेले युद्ध

‘ईशान्येकडील राज्यांत आदिवासी, कश्मीरमध्ये मुस्लिम, पंजाबमध्ये शीख, तेलंगणात आदिवासी, गोव्यात ख्रिश्चनांविरुद्ध हिंदुस्थान सरकारने युद्ध पुकारले आहे. हे उच्चवर्णीय हिंदू सरकारने लादलेले युद्ध आहे आणि ते सतत सुरू आहे, असे रॉय यांनी म्हटले आहे.