ॲपेक्स हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा लवकरच आदेश निघणार – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील ॲपेक्स हॉस्पिटलने कोविड रूग्णांकडून भरमसाठ बीले आकारल्याची तसेच कोविड प्रोटोकॉल प्रमाणे उपचार न केल्याच्या तक्रारीमुळे प्रशासनाने ॲपेक्स हॉस्पिटलमधील आयसीयु विभाग ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याने ॲपेक्स हॉस्पिटल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

लवकरच अॅपेक्स हॉस्पिटल ताब्यात घेण्याची ऑर्डर काढ़ू असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. गेल्यावर्षी ॲपेक्स हॉस्पिटलने कोविड केअर सेंटर सुरू केले तेव्हापासून बिलांबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या.त्याचवेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कारवाईचे संकेत दिले होते.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पुन्हा कोविडने थैमान घातले आहे. अशावेळी पुन्हा ॲपेक्स हॉस्पिटलच्या कोविड सेंटरबाबत तक्रारी येऊ लागल्याने ॲपेक्स हॉस्पिटलच्या कोविड सेंटरचा दर्जा कमी करण्यात आला.त्यानंतरही तक्रारी आल्याने ॲपेक्स हॉस्पिटलमधील आयसीयु विभाग ताब्यात घेण्याचा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.

ॲपेक्स हॉस्पिटलबाबत सुरू असलेल्या घडामोडींमुळे रूग्ण आणि नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधून ॲपेक्स हॉस्पिटलबाबतच्या कारवाई बाबत विचारले असता मिश्रा म्हणाले की, ॲपेक्स हॉस्पिटल ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच ताबा घेण्याची ऑर्डर काढणार आहे.