रिक्षाचालकाला आली 3 कोटींची इन्कम टॅक्स नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे एका रिक्षा चालकाला चक्क 3 कोटी रुपयांची इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. या नोटिसीमुळे धक्का बसलेल्या रिक्षा चालकाने पोलिसात धाव घेतली आहे.

मथुरा येथील बाकलपूरच्या अमर कॉलनीत प्रताप सिंह नावाचे गृहस्थ राहतात. व्यवसायाने ते रिक्षाचालक आहेत. त्यांना तब्बल तीन कोटी रुपयांचा आयकर थकवल्याची नोटीस आयकर विभागाने पाठवली.

ही नोटीस पाहताच सिंह यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांनी पोलिसात धाव घेतली. सोशल मीडियावरही त्यांनी ही घटना सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्ज दिला होता. पण, त्यांचं पॅन कार्ड त्यांना दिलेल्या मुदतीत आलं नाही. त्याऐवजी संजय सिंह नावाच्या व्यक्तिला देण्यात आलं.

सिंह यांनी वारंवार तक्रार केल्यानंतर त्यांना पॅनकार्डची कलर प्रिंट देण्यात आली. मात्र, ते अस्सल पॅन कार्ड नाही, हे सिंह ओळखू शकले नाहीत. या कार्डवरूनच त्यांना आयकर नोटीस आली आहे. त्यात त्यांना 3 कोटी 47 लाख 54 हजार 896 रुपये चुकते करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.