राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे बंद

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहिला असून, राधानगरी धरणाचे गेल्या तीन दिवसांपासून उघडलेले दोन्ही स्वयंचलित दरवाजे आज (शुक्रवार) दुपारी बंद झाले. परंतु अजूनही 22 बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 5 व 6 आज दुपारपर्यंत उघडलेला होता. त्यामधून 4 हजार 256 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. सध्या पंचगंगा, भोगावती, वारणा, दुधगंगा, कासारी या नद्यांवरील 22 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, पंचगंगेच्या पातळीतही आज दिवसभरात तीन इंचांची घट झाली. सकाळी सातच्या सुमारास 29 फूट असलेली पातळी सायंकाळी सहाच्या सुमारास 28 फूट 9 इंच झाली होती. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 45.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.