रिक्षाचालकांची पोलिसांना मारहाण

रेल्वे पोलिसांना दोन रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार वाशी रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दोन्ही रिक्षाचालकांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकांची नावे दत्ता सुतार (50) आणि महेश सुतार (39) अशी आहेत. पोलीस शिपाई प्रवीण मनवर आणि त्यांचे सहकारी आरोपीला मेडिकल करण्यासाठी घेऊन जाण्याकरिता रघुलिला मॉलसमोर रिक्षा स्टॅण्डवर आले. तिथे रिक्षाचालकांनी त्यांना नेण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून रिक्षाचालक दत्ता आणि महेश यांनी मनवर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. सदर प्रकारानंतर रेल्वे पोलिसांनी या दोन्ही रिक्षाचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही रिक्षाचालकांना अटक केली असून ते पुढील तपास करीत आहेत.