तोतरेपणा घालवण्यासाठी..

>> वैद्य सत्यव्रत नानल

बऱयाच मुलांमध्ये आणि मोठय़ा व्यक्तींमध्येदेखील तोतरेपणा, अस्पष्ट शब्दोच्चार अशी सवय असते. याला एक कायमची सवय किंवा रोग अशी समजूत आहे. बऱयाच वेळेस तसे नसते. योग्य वेळी योग्य उपचार आणि मदत पुरवून अशा मुलांचे तोतरेपण घालवता येते. वेळीच उपाय न झाल्याने त्या मुलांमध्ये न्यूनगंड, कमीपणाची भावना निर्माण होते.

कारणे
जीभ मोकळी नसणे –  काही वेळेस बालकाची जीभ खालच्या बाजूला मोकळी नसते. त्यामुळे जिभेची हालचाल पूर्ण होत नाही. त्यामुळे पुढे मुलं स्पष्ट बोलू शकत नाही. अशा वेळी योग्य सल्ला घेऊन औषधांनी किंवा छोटेसे शल्यकर्म करून ती जीभ मोकळी करून घेता येते.

बऱयाच वेळा इतर काहीही कारण निश्चित न होतासुद्धा जीभ जड झालेली असते. यामध्ये वातादोषची विकृती कारण असते. अशा वेळी त्याअनुषंगाने आपल्या वैद्याकडून योग्य चिकित्सा घ्यावी. सोबत पुढील उपाय नियमितपणे करावेत. त्यामुळे फायदा होतो.

मुलांमध्ये सर्दी होण्याचे प्रमाण खूप असते. वारंवार सर्दी झाल्याने डोके, चेहऱयातील भागात कफ साठून अनेक रोग किंवा त्रास होतात. कफ साठल्याने मानेकडून वर डोक्याकडे होणारा रक्त पुरवठा नीट होणे कमी होते. अशा वेळी वेगवेगळय़ा इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. यातच एक प्रकार म्हणजे जीभ जड होणे. जिभेची जडपणामुळे हालचाल मंदावणे, झाले तरी शब्द उच्चारण अस्पष्ट होते. अशा वेळी असलेली सर्दीची सवय मोडण्यासाठी आपल्या वैद्याकडून योग्य चिकित्सा घेऊन उपचार घ्यावेत.

उपाय
वेखंड हे इंद्रियांची कार्यक्षमता वाढवणारे औषध आहे. रोज तीन-चारवेळा एक एक चिमूट वेखंड पाव चमचा मधासह एकत्र करून मुलांच्या जिभेवर चाटवावे. जीभ हलकी होते.

 मुलांना काही व्यायाम प्रकार शिकवावे आणि ते त्यांच्याकडून नियमित करून घ्यावेत. जसे, आपले हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. जीभ जेवढी शक्य तेवढी तोंडातून बाहेर काढावी आणि आपल्या हाताने पकडून ठेवावी. जसे जीभ पकडणे आपण सुरू करतो तसे जीभ हातातून निसटून आत जाण्यासाठी आपोआप शरीराकडून प्रयत्न सुरू होतात. तरीही जीभ तोंडाबाहेर एक-दोन-तीन मिनिटांपर्यंत पकडून ठेवावी. अशा वेळी तोंडातून बऱयाच वेळा लाळ सुटते, ती सुटू द्यावी. याने जीभ पटापट वळू लागते आणि तोतरेपणा कमी होतो.

पाव चमचा हळद आणि पाव चमचा मध एकत्र करून जिभेवर चोळावे. नंतर तोंड बंद करून लाळ सुटू द्यावी. 5 मिनिटे लाळ सुटलेली तोंडातच धरून ठेवावी आणि नंतर थुंकून टाकावी. त्यानंतर कोमट पाण्याने तोंड धुवावे. याने जीभ जाड असेल तर जाडपणा, सूज कमी होते, शब्द स्पष्ट होतात.

 लहान मुलांना योगासनांमधील सिंहमुद्रा खेळ म्हणून शिकवावे. जीभ मोकळी होते.

 थोडी मोठी झालेली मुले असतील तर त्यांना तोंडातून तेल धरून ठेवण्यास शिकवावे. याला आयुर्वेदात ‘कवलधारण’ असे म्हटले जाते. आजकाल ‘ऑइल पुलिंग’ नावाने हे बरेच प्रसिद्धही झाले आहे. तीळ तेल कोमट करावे. तोंडातील दोन भाग येवढे तेल तोंडात धरावे. गाल फुगवून हे तेल धरून ठेवावे. तोंडाचा एक तृतीयांश भाग रिकामा ठेवावा. याने ठसका लागत नाही आणि श्वास ही व्यवस्थित घेता येतो. दहा ते पंधरा मिनिटे किमान असे तेल तोंडात धरून ठेवावे. लाळ आणि तेल नंतर थुंकून टाकावे आणि कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात आणि दोन घोट कोमट पाणी प्यावे. हे थोडय़ा मोठय़ा झालेल्या मुलांपासून ते मोठय़ा कोणत्याही व्यक्तीने करता येते. ही क्रिया करताना जर नाक आणि डोळय़ातून पाणी किंवा स्राव आले तर सर्वाधिक फायदा झाला असे निश्चित समजावे. स्राव नाही झाले तर कमी फायदा झाला असे समजावे, पण फायदा होतोच हे खात्रीशीर आहे.

 मारुतीस्तोत्र किंवा हनुमान चालीसा रोज नियमित म्हणणे हे तोतरेपणाचे एक अतिशय उत्तम चिकित्सा साधन आहे. हे एक जोशात म्हणावयाचे काव्यस्तोत्र आहे. याने जिभेसह संपूर्ण गळय़ापर्यंत सर्व अवयवांचे व्यायाम होतात. सलग सहा महिने जर उपाय केले तर टिकाऊ परिणाम ही दिसू लागतो.