आगीच्या घटना टाळण्यासाठी लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील पॅण्ट्री कारचे स्वरूप बदलणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लांबपल्ल्याच्या गाड्यामध्ये प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी जोडल्या जाणाऱ्या पॅण्ट्री कारचे स्वरूप संपूर्ण बदण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅण्ट्री कारमध्ये आता गॅस शेकडीऐवजी इंडक्शन किंवा विद्युत शेगडीचा वापर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे भविष्यात पॅण्ट्री कार अत्याधुनिक होऊन इंधन बचतही होणार आहे.

देशात बऱ्याच मेल एक्स्प्रेसमध्ये पॅण्ट्री कारमध्ये अजूनही गॅस शेगडीचा वापर होत असतो. तो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याने त्याचा वापर बंद होणार आहे. राजधानी एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या निर्मितीवेळीच पॅण्ट्री कारचे स्वरूप संपूर्णपणे बदलण्यात आले आहे. यापुढे इतर गाड्यामध्येही हळूहळू गॅस शेगडी बंद होऊन त्याच्या जागी इंडक्शन शेगडी वा अन्य विजेवर चालणारी उपकरणे वापरली जाणार आहेत. रेल्वेच्या मुंबई-कोकण, गुजरात आदी पश्चिम विभागातील 146 लांबपल्ल्याच्या गाड्यात हे बदल होणार आहेत. देशभरात पारंपरिक पॅण्ट्री कारची संख्या 300 पेक्षाही अधिक आहे. त्यातील पॅण्ट्री कारमधील किचन प्लॅटफॉर्मपासून ते शेगड्यापर्यंत सर्वांतच बदल होणार आहेत. नव्या पॅण्ट्री कारमधील किचन प्लॅटफॉर्मची उंची आताच्या रचनेपेक्षा कमी राहणार आहे. इंडक्शन, विद्युत शेगड्यामुळे जलद वेळेत अन्न शिजण्यास मदत होणार आहे.

गाड्यांमधला मेनू बदलणार

काही ठिकाणी रेल्वेच्या बेस किचनमध्ये तयार केलेले खाद्यपदार्थ पुरवले जातात वा कंत्राटदारांमार्फत खानपान सेवा चालवली जाते, तर काही गाड्यांना पॅण्ट्री कार लावण्यात आलेली असते तेथे खाद्यपदार्थ शिजविण्यासाठी प्रामुख्याने गॅस शेगडीचा वापर होता. यामुळे प्रवाशांच्या जिवाला आग लागून धोका उत्पन्न होऊ शकतो. त्याकरिता काही गाड्यांमध्ये कोणतेही अन्न न शिजवता तयार खाद्यपदार्थ पुरविले जातात. नव्या धोरणानुसार गॅसऐवजी विजेचा वापर करण्याच्या निर्णयामुळे गाड्यांमधील मेनूही बदलण्याची शक्यता आहे.