उद्योग क्षेत्रातील मानाचे पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योग विभागाच्या वतीने देण्यात येणारे ‘उद्योगरत्न’, ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्या वतीने टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला. टाटा यांना शनिवारी उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत, असे प्रशंसोद्गार यावेळी राज्यपाल बैस यांनी काढले.

उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना प्रदान करण्यात आला. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरूप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरूप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरूप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी यावेळी उपस्थित होते.