मराठी नाटक समूहाचे नाट्य पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी नाटक समूह, प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या सहयोगाने दिले जाणारे नाट्यक्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. या अंतर्गत, ज्येष्ठ नाटककार चं.प्र.देशपांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांना आणि ज्येष्ठ दिग्दर्शिका विद्या पटवर्धन यांना ‘प्रदीर्घ योगदान पुरस्कार’ देण्यात येणार आहे. तसेच, प्र. ल. मयेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना आणि शरद तळवलकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांना जाहीर झाला आहे. 3 जून रोजी शिवाजी मंदिरात रंगणाऱ्या प्रायोगिक नाट्य महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारांच्या सोबतच विशेष योगदान पुरस्कारही देण्यात येणार आहेत. वर्धा येथे ‘ऍग्रो थिएटर’ची संकल्पना राबवून तिचा प्रसार करणारे प्रायोगिक रंगकर्मी हरीश इथापे आणि पुणे येथे ‘इंटिमेट थिएटर’ संकल्पनेचा प्रसार करणारे प्रायोगिक रंगकर्मी प्रदीप वैद्य यांची विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी नाटक समूहातर्फे यावेळी प्रायोगिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जून रोजी शिवाजी मंदिरात पूर्ण दिवस आयोजित या सोहळ्यात कल्याणच्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे ‘मिशन 59’, गोव्याच्या हंस संगीत मंडळींचे ‘अव्याहत’ आणि मुंबईच्या माध्यम कलामंच या संस्थेच्या ‘खगनिग्रह’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नाट्य महोत्सव आणि नाट्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, आशीर्वाद मराठे, चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर, निर्मिती सावंत, अनिल बांदिवडेकर, शीतल तळपदे, कौशल इनामदार, जयवंत वाडकर, दीपक करंजीकर, श्रीनिवास नार्वेकर, महेंद्र तेरेदेसाई, राजीव जोशी, आशुतोष घोरपडे, मानसी मराठे, आभास आनंद यांच्यासह अनेक रंगकर्मी यावेळी उपस्थित होते.