
कोरोना विषयावरील ब्रेल पुस्तक गेल्या वर्षी मराठी भाषेत प्रकाशित झाले होते. लेखक आणि सर्पमित्र भरत जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यानंतर ते आता हिंदी भाषेतही प्रकाशित झाले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून देशभरातील नेत्रहिनांमध्ये कोरोना विषयावर अनोखी जनजागृती करण्याचा भरत जोशी यांचा प्रयत्न आहे.
भरत जोशी यांनी मागील 15 वर्षांत अंधांसाठी अनेक ब्रेल पुस्तके लिहिली. गेल्या वर्षी त्यांनी ‘कोरोना विषाणू कोविड-19 आजार आणि उपाययोजना’ हे 21 वे मराठी ब्रेल पुस्तक लिहिले. ते आता हिंदीतही उपलब्ध झाले आहे. ‘कोरोना विषाणू कोविड-19 बिमारी और इलाज’चे प्रकाशन नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कोरोनाची लक्षणे, प्रसार, उपाय, घ्यावयाची काळजी, लसीकरण, सुरक्षिततेची नियमावली, मास्क लावणे, सुरक्षित अंतर याबाबत ब्रेल पुस्तिकेतून मार्गदर्शन करण्यात आले आहे. 24 पानी पुस्तिका लवकरच देशभरातील सुमारे 350 अंधशाळा आणि 50 संस्थांमध्ये मोफत दिली जाणार असल्याची माहिती भरत जोशी यांनी दिली.




























































