राम जन्मभूमीप्रकरणी मध्यस्थ समिती सर्वोच्च न्यायालयात; पुन्हा चर्चेची मागणी

476
supreme-court

रामजन्मभूमी प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थ समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर निवेदन सादर केले. राम जन्मभूमीप्रकरणी तोडगा काढण्यासाठी पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रकरणातील पक्षकारांनी पुन्हा चर्चा सुरू करण्याची विनंती मध्यस्थ समितीला केली आहे. त्यानंतर या समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाबाहेर तडजोड झाली नाही. त्यामुळे याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेली मध्यस्थ समितीही कोणत्याही निष्कर्षा पर्यंत आली नव्हती. तसेच कोणताही तोडगा दृष्टीपथात आला नव्हता. त्यामुळे 23 दिवसांपासून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरु आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मध्यस्थीद्वारे या प्रकरणावर तोडगा काढण्यात यावा, यासाठी दोन्ही पक्षकारांनी मध्यस्थ समितीला पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील सुन्नी वक्फ बोर्ड या पक्षकारांनी मध्यस्थ समितीला पत्र लिहिले आहे. चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर, निर्वाणी आखाड्यानेही चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निर्वाणी आखाड्याच्या या भूमिकेशी निर्मोही आखाडाही सहमत आहे.

सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होण्यापूर्वी न्यायालयाने मध्यस्थीने तोडगा निघावा, यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यावर कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. या मध्यस्थ समितीत न्यायाधीस एफ. एम. कलीफुल्ला, वरिष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा समावेश होता. या समितीद्वारे कोणताही तोडगा निघू न शकल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी घेण्यात येत आहे. या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. तर मुस्लिम पक्ष आता बाजू मांडत आहे. पाच सदस्यांच्या घटनापीठाद्वारे या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या पीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधीश एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या