भूमीपूजनापूर्वी कोरोनाचे संकट, प्रभू श्रीरामाचे पुजारी आणि 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिरासाठीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर कोरोनाचे संकट घोंगावायला लागले आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते प्रधान पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. याशिवाय अयोध्येत तैनात असलेल्या 16 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

अयोध्यानगरी बनणार हायटेक पर्यटन केंद्र

राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी असलेले आचार्य सत्येंद्र दास यांच्यासोबत 4 पुजारी प्रभू श्रीरामाची सेवा करतात. प्रदीप दास हे यातलेच एक पुजारी आहे. दास यांना कोरोना झाल्याचे कळाल्यानंतर त्यांना घरातच विलगीकरणात पाठवले आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांनाही विलगीकरणात पाठवलं आहे.

5 ऑगस्टला होणाऱ्या रामजन्मभूमी मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमात 200 लोकं सहभागी होणार आहेत. कोरोनामुळे जास्त लोकांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. मोजक्याच लोकांना शिलान्यासाच्या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आहे. निमंत्रितांना 50-50 च्या गटामध्ये विभागले जाणार आहे. या कार्यक्रमाला फक्त 50 साधूसंतानाच परवानगी देण्यात आली आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांच्यासारख्या राम मंदिर आंदोलनाशी निगडीत नेत्यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.

जगभरातील हिंदूंना ज्या क्षणाची ओढ लागली होती तो आता जवळ आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीचा वनवास संपला असून पाच ऑगस्टला वेदमंत्रांच्या जयघोषात प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमाचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली. मात्र या कार्यक्रमापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याची बातमी आल्याने कार्यक्रमावर चिंतेचे ढग जमायला लागले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत पाच ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली होती. राममंदिराचा शिलान्यास करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्राचे व हनुमान गढी येथे दर्शन घेतील. या कार्यक्रमासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आल्याचेही स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले होते.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या मुळ आराखडय़ात काही बदल सुचवले आहेत. ट्रस्टने मंदिराचे नाव श्रीराम जन्मभूमी मंदिर असे ठेवले आहे. मंदिराचा आकार वाढवून 84600 चौरसफूट करण्यात आला आहे. अगोदर मंदिराची क्षमता 20 हजार भाविकांची होती, ती आता 50 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.