
अयोध्येतील भगवान रामलल्ला लहान आहे. या बाल रामलल्लाची संपत्ती कोणी बळकावू शकत नाही. किंबहुना, ती विकूही शकत नाही, असा युक्तिवाद ‘रामलल्ला विराजमान’चे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला. ईश्वराच्या ताब्यात असलेल्या संपत्तीला कायदाही हात लावू शकत नाही, असाही जोरदार दावा त्यांनी सुनावणीदरम्यान केला.
अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या नवव्या दिवसाची सुनावणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठापुढे झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे ‘रामलल्ला विराजमान’च्या वतीने ऍड. वैद्यनाथन यांनी जोरदार युक्तिवाद केला. अयोध्येतील जागा राम जन्मभूमी आहे, भले त्याठिकाणी मंदिर असो वा नसो. हे सिद्ध करण्यासाठी लोकांची श्रद्धाच पुरेशी आहे. हिंदूंनी नेहमीच या जागेवर पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मूर्ती ठेवण्यामुळे या जागेला पावित्र्य लाभते, असे ऍड. वैद्यनाथन यांनी न्यायालयाला सांगितले. जन्मस्थान जर देवता असेल, तर त्या जागेवर कोणीही बाबरी मशिदीच्या आधारे दावा करू शकत नाही. याठिकाणी मंदिर होते व लोक अजूनही पूजा करताहेत, या जागेवर अन्य कोणीही दावा करू शकत नाही. कारण जन्मस्थान स्वत:च एक देवता असते, असेही ऍड. वैद्यनाथन यांनी नमूद केले.
बाबराने कधीही मशीद बांधली नाही
‘रामलल्ला विराजमान’चे वकील ऍड. वैद्यनाथन यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राम जन्मभूमी पुनरुद्धार समितीच्या वतीने वरिष्ठ वकील पी. एन. मिश्रा यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. बाबराने या ठिकाणी कधीही मशीद बांधलेली नाही. हिंदू लोक फार पूर्वीपासून येथे पूजाअर्चा करताहेत. आम्ही या जागेला राम जन्मभूमी म्हणतो, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांनी स्कंद पुराणाचा संदर्भ दिला. त्यावर न्यायालयाने पुराण आणि धर्मग्रंथ न ऐकवता ठोस पुरावे सादर करा, असे त्यांना बजावले.























































