राममंदिर भूमिपूजनानंतर अयोध्येतील जागांचे भाव गगनाला भिडले!

कोरोना महामारीचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही काहीसे मंदीचे वातावरण असून काही शहरांतील जागांचे भाव कमी झाल्याचे चित्र आहे, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मात्र राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर अयोध्येतील जागांचे भाव वाढताना दिसत आहेत. एका महिन्यात येथील जागांचे दर दुपटीने वाढलेत.

रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतरच अयोध्येतील भूखंडांच्या दरात जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या भूमिपूजनानंतर अयोध्येमध्ये मालमत्तेचे दर 1 हजार ते 1 हजार 500 रुपये प्रति चौरस फूट झाले आहेत, तर शहरामध्ये हे दर 2 हजार ते 3 हजार रुपये प्रति चौरस फुटांवर गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी या ठिकाणी 900 रुपये प्रति चौरस फूट दराने जमीन मिळत होती अशी माहिती मालमत्ताविषयक सल्गागार ऋषी टंडन यांनी दिली.

व्यावसायिक गुंतवणूक
अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ, थ्री स्टार्स हॉटेल्स आणि इतर काही प्रोजेक्ट उभारणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या घोषणेनंतर व्यावसायिक गुंतवणुकीत वाढ झाली असून अनेक उद्योजकांकडून प्रकल्पासाठी जमिनी खरेदी केल्या जात आहेत. स्aारकारदेखील काही प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण करत आहे. त्यामुळे शहराबाहेरील जागांनाही चांगला भाव मिळताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या