मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

25199

अयोध्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचीच असून तेथेच भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग आज अखेर मोकळा झाला. अयोध्येतील ‘ती’ जागा हिंदूंची असून रामजन्मभूमीच्या जागेवरच मंदिर उभारावे. त्यासाठी ट्रस्ट स्थापन करावे असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. त्यामुळे ‘मंदिर वहीं बनेगा’ हे कोटय़वधी जनतेचे स्वप्न प्रत्यक्षात आता आले आहे. हा निर्णय देतानाच अयोध्येत मशिदीसाठी पाच एकर जागा द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या 134 वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन लढा आता संपला आहे. दरम्यान, या निकालाकडे देशाचेच नाही, तर अवघ्या जगाचे लक्ष होते. या निकालाचे सर्वच राजकीय पक्षांनी, विविध समूहांनी स्वागत केले असून अयोध्येसह देशभरात शांततेचे वातावरण आहे.

देशाचे राजकारण, समाजकारण ढवळून काढणाऱ्या अयोध्या प्रकरणाचा खटला हिंदुस्थानच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण होता. 6 ऑगस्ट 2019 पासून 40 दिवस अयोध्या खटल्यावर नियमित सुनावणी घेतल्यानंतर 16 ऑक्टोबरला घटनापीठाने सुनावणी पूर्ण केली. 17 नोव्हेंबरला सरन्यायाधीश रंजन गोगोई हे सेवानिवृत्त होत आहेत. तत्पूर्वी शनिवारी हा खटल्याचा निकाल आला आहे.

घटनापीठाचा एकमताने निर्णय
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांच्या घटनापीठाने एकमताने अयोध्येत राममंदिराचा निर्णय दिला. 1045 पानांचे हे ऐतिहासिक निकालपत्र आहे.

न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

मोकळ्या जागेवर बाबरी मशीद बांधली नाही – आयोध्येतील राममंदिर तोडून मशीद बांधण्यात आली नव्हती असा मुस्लिम पक्षांचा दावा होता, मात्र हा दावा न्यायालयाने फेटाळला. बाबरी मशीद मोकळ्या जागेवर बांधली नाही. त्याखाली 12 व्या शतकातील मंदिर होते हे न्यायालयाने मान्य केले. यासाठी पुरातत्व खात्याचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननामध्ये मंदिराचे अवशेष सापडल्याचे स्पष्ट पुरावे दिले होते. ते पुरावे घटनापीठाने ग्राह्य धरले.

रामलल्ला विराजमान – जन्मस्थळास कायदेशीर व्यक्ती मान्यता येईल का याचे उत्तरही न्यायालयाने स्पष्ट दिले आहे. जन्मस्थानाला नाही तर रामलल्ला विराजमानाला कायदेशीर पक्ष मानता येईल.

ayodhya

श्री रामांचा जन्म अयोध्येत – हिंदूंचा दृढ विश्वास आणि श्रद्धा आहे की अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला यावर कोणताही वाद होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सांगितले. बाबरी मशीद 16व्या शतकात उभारले. त्याखाली मंदिर होते हे पुरातत्व खात्याच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे, असाही पुनरुच्चार न्यायालयाने केला.

1856 च्या आधी पूजाअर्चा – ‘त्या’ जागेवर 1856 सालच्या आधी हिंदूंकडून पूजाअर्चा होत होती.

नमाज पठणाचे पुरावे नाहीत – 1856-57 पूर्वी त्या ठिकाणी नमाज पठाण होत होते याचे कोणतेही पुरावे नाहीत असे स्पष्टपणे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाचा दावा फेटाळून लावला.

ram-janmabhumi

निर्मोही आखाडा, शियाचा दावा फेटाळला
शिया वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडय़ाचा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने फेटाळला. केवळ रामलल्ला विराजमान आणि मुस्लिम पक्षकारांच्या वतीने सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढण्याचा हक्क मान्य करण्यात आला.

ayodhya-babri

2.77 एकर जागा रामलल्लाची
अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2.77 एकर जागा तीन पक्षकारांना रामलल्ला, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा यांच्यात समसमान वाटप करण्याचा निर्णय दिला होता, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल केला. संपूर्ण 2.77 एकर जागा रामलल्लाची असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणी
राममंदिर उभारणीसाठी ट्रस्टची तीन महिन्यांत स्थापना करण्यात यावी. या ट्रस्टद्वारे मंदिर निर्माणासंदर्भात नियम तयार करावेत, असे आदेशही सरन्यायाधीश गोगोई यांनी केंद्र सरकारला दिले.

मशिदीसाठी 5 एकर जागा
बाबरी मशिदीखाली मंदिर होते हे न्यायालयाने मान्य केले. आता मशीद उभारण्यासाठी अयोध्येत दुसरीकडे 5 एकर जागा द्यावी. उत्तर प्रदेश सरकार किंवा केंद्राकडून ही जागा देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कोर्टाने 417 वेळा ‘राम’नाम घेतले!
निकालाचे वाचन करताना घटनापीठाने तब्बल 417 वेळा ‘राम’नाम घेतले. 1 हजार 45 पानांच्या निकालपत्रात 1,062 वेळा हिंदू शब्द लिहिण्यात आला असून मशीद या शब्दाचा उल्लेख 1,144 वेळा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या