
मिलिंद देखणे
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने नगर शहरात उभारण्यात येणाऱ्या आयुष रुग्णालयाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन रुग्णांना कमी दरात उपचार कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, निधीची कमतरता असल्याने 26 जानेवारी रोजी होणारे रुग्णालयाचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाने चार कोटींचा प्रस्ताव केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे सादर केला आहे. हा निधी आल्यानंतरच रुग्णालयाचे काम सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने देशभरात आयुष रुग्णालयांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. नगर जिह्यासाठीही हे आयुष रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र, सुरुवातीपासूनच हे रुग्णालय वादाच्या भोवऱयात पडले होते. रुग्णालयाच्या ठिकाणी एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती. त्या शाळेला हे मैदान वापरण्यासाठी देण्यात आले होते. या जागेचा वाद निर्माण झाला होता. तत्कालीन खासदार दिवंगत दिलीप गांधी व दिवंगत अनिल राठोड यांनीही रुग्णालयासोबतच शाळेचे मैदानही महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यावेळी मांडली होती. मात्र, सत्ताधाऱयांच्या निर्णयामुळे शाळा प्रशासनाला दुसरीकडे मैदान तयार करावे लागले होते. त्यानंतर 1 सप्टेंबर 2019 रोजी या कामासाठी कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला होता.
तारकपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भूखंडावर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून आयुष रुग्णालयाचे 2020 मध्ये काम सुरू झाले होते. 33 हजार चौरस फुटांवर या रुग्णालयाची इमारत तयार झाली असून, दोन मजली इमारतीतील पहिला मजला हा 18 हजार 943 चौरस फूट, तर दुसरा मजला 17 हजार 390 चौरस फुटांचा आहे. एकूण 30 बेडचे हे रुग्णालय आहे. या आयुष रुग्णालयातून अल्पदरात नगरकरांना आयुर्वेदिक उपचार व औषधे उपलब्ध होणार होती. या रुग्णालयातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी मध्यंतरीच्या काळात स्वतंत्र बैठका घेऊन काम तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंदच आहे. 26 जानेवारीला या रुग्णालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, फर्निचर व अन्य कामे न झाल्याने हे उद्घाटन लांबणीवर पडले होते.
पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी या रुग्णालयाला भेट देऊन पाहणीदेखील केली होती. फर्निचर व अन्य सुविधा नसल्यामुळे उद्घाटन करता येणे शक्य नसल्याने ते थांबवण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने फर्निचर व अन्य बाबींसाठी चार कोटींचा प्रस्ताव केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला अद्यापि मान्यता मिळालेली नाही. चार कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच आयुष रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी महामार्ग असल्यामुळे हा महामार्ग ओलांडून या नवीन रुग्णालयाची इमारत उभी राहत आहे. जुन्या शासकीय रुग्णालयामध्येच ही इमारत उभी करावी, अशी मागणी सुरुवातीला झाली होती. मात्र, त्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी व अधिकारी राहत असलेल्या जागेच्या शेजारी असणाऱया मैदानावर हे रुग्णालय उभारण्याचा अट्टहास प्रशासनाने धरला होता, तेव्हापासूनच या रुग्णालयाचा विषय चांगलाच गाजला होता.




























































