
निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या 20 वर्षीय आयुष शेट्टीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत आयुषने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या कुनलावुत विटिडसार्न याचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. आयुषने हा सामना 10-21, 21-19, 21-17 अशा फरकाने जिंकत जागतिक बॅडमिंटन जगताला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सामन्याची सुरुवात आयुषसाठी आव्हानात्मक ठरली. विटिडसार्नने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आयुषला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले, ज्यामुळे पहिला गेम आयुषने 10-21 असा सहज गमावला. मात्र, खचून न जाता आयुषने दुसऱ्या गेममध्ये कमालीचा संयम आणि आत्मविश्वास दाखवला. त्याने विटिडसार्नच्या प्रत्येक गुणाला तोडीस तोड प्रत्युत्तर देत दुसरा गेम 21-19 असा खिशात घातला आणि सामन्यात बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये आयुषने पूर्ण नियंत्रण मिळवत 21-17 अशा फरकाने विजय मिळवून कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
या विजयामुळे आयुष शेट्टीने हिंदुस्थानच्या बॅडमिंटन इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. 1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, त्यानंतर तब्बल 61 वर्षांनी ही किमया करणारा आयुष हा दुसराच हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. याआधी 2018 मध्ये एच. एस. प्रणॉयने पुरुष एकेरीत पदक जिंकले होते, त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच हिंदुस्थानी पुरुष खेळाडू आहे. हिंदुस्थानला या स्पर्धेत शेवटचे पदक 2023 मध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मिळवून दिले होते.
जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या आयुषचा या स्पर्धेतील प्रवास थक्क करणारा राहिला आहे. विद्यमान यूएस ओपन सुपर ३०० विजेत्या आयुषने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आणले. त्याने पहिल्या फेरीत सातव्या क्रमांकावरील ली शी फेंगचा पराभव केला, त्यानंतर चिन यू जेनला मात दिली आणि उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला नमवून आपली क्षमता सिद्ध केली. लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांसारखे दिग्गज खेळाडू लवकर बाद झाले असताना आयुषने भारताच्या पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता सुवर्णपदकासाठी त्याचा सामना चाऊ टिएन चेन किंवा शी युकी यांच्यातील विजेत्याशी होईल.




























































