
गेल्या चार महिन्यांत पतंजली कंपनीच्या ‘कोरोनिल’ औषधाच्या 25 लाख किट्सची विक्री झाली आहे. यातून पतंजलीने 241 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यावरून बाबा रामदेव यांना ’कोरोनिल’ची मात्रा लागू पडल्याची चर्चा आहे.
सध्या देशविदेशात पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाची विक्री होत आहे. ऑनलाईन तसेच थेट मार्केटिंग, स्टोअर्स, मेडिकल सेंटर येथे कोरोनिल विक्रीसाठी उपलब्ध आहे. पतंजली कंपनीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 18 ऑक्टोबरपर्यंत कोरोनिलचे 25 लाख किट विकले गेले आहेत.
जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू असताना बाबा रामदेव यांनी 23 जून रोजी पतंजलीचे कोरोनिल औषध लाँच केले होते. कोरोनिलमुळे कोरोना आठवडय़ाभरात बरा होतो, असा दावा करण्यात आला. मात्र लॉंचिगपासून हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले.
























































