डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर

542

राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य आणि देशाच्या कानाकोपऱयापासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर दाखल झाला आहे. कष्टकरी, दीनदुबळ्यांच्या या कैवाऱ्याचे दर्शन घेण्यासाठी भीमसैनिकांच्या चैत्यभूमीवर रांगा लागल्या आहेत.

‘शिका, संघटित व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढा’ हा महामंत्र देणाऱया या महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. डोक्यावर निळी टोपी, झेंडा घेऊन मुलाबाळांसह रेल्वे, बस गाडय़ांतून अनुयायी दादरमध्ये दाखल होत आहेत. यात तरुणाईही मोठय़ा प्रमाणात आहे. ‘जय भीम’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांनी चैत्यभूमी परिसर दणाणून जात आहे. चैत्यभूमीवर गोंधळ होऊ नये, शिस्तीने सगळे पार पडावे यासाठी स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्क परिसरात लाखो भीमसैनिक पोलिसांसह कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून मोफत अन्नदान करण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

– ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱयातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी 40 हजार अधिकारी व कर्मचाऱयांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. याशिवाय सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस आणि 500 होमगार्डदेखील सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

n चैत्यूभमी, शिवाजी पार्क मैदान व परिसर आणि दादर व आजूबाजूच्या गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीतून वॉच ठेवण्यात येणार असून साध्या वेशातील पोलिसांची सतर्क गस्त राहील. दादर चौपाटी समुद्रकिनारी पोलीस नौकेद्वारे गस्त घालणार आहेत. अनुयायांना कोणतीही समस्या आल्यास त्यांनी 100 किंवा 773813333/ 7738144144 या क्रमांकांवर एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या