
परतूर येथील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर भाजप सरकारच्या विरोधात लिहिणारांचा थेट बापच काढला! ‘मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिलेत!’ असे बोलून लोणीकर थांबले नाहीत, तर ‘तुझ्या अंगावरचे कपडे, बूट, चप्पलही मोदी सरकारनेच दिलेली आहे…’ असा माजही त्यांनी दाखवला. चोहोबाजूने थोबाड शेकून निघाल्यानंतरही लोणीकरांचे डोके ठिकाणावर आले नाही. ‘ही आमची बोलीभाषा आहे’, असे म्हणत मराठी भाषेवर खापर फोडून ते मोकळे झाले.
एका कार्यक्रमात बोलताना याच सोशल मीडियावर भाजप आमदार बबनराव लोणीकर घसरले. ‘कुच्चरओट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वाट्टेल ते लिहितात. या लिहिणाराच्या आईचा पगार, बापाला पेन्शन दिली लोणीकरने. लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे कुणी टाकले, आमच्या सरकारने. मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असे अकलेचे तारे आमदार लोणीकरांनी तोडले होते.
यावरून चोहोबाजूने टीकेचा भडिमार झाल्यानंतरही लोणीकरांची भाषा बदलली नाही. उलट त्यांनी आपले बोलणे हे बोलीभाषेत असल्याचे समर्थन केले. आमची भाषा खेड्यातली आहे, असे सांगत त्यांनी सारवासारव केली.
लोणीकर बोलले ते चूकच; समज देणार ः फडणवीस
भाजपच्या नेत्यांनी वाटेल तसे बरळायचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सारवासारव करायची हे आता नित्याचेच झाले आहे. बबनराव लोणीकरांचे वक्तव्यही चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले. यासंदर्भात भाजपच्या शिस्तपालन समितीकडून लोणीकरांना कडक समज देण्यात येईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.