पाकिस्तानी बाबरचं पानिपत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

इतिहासातला मोगल बाबर पानिपतची पहिली लढाई जिंकला. त्याने इब्राहिम लोदीला पराभूत केलं. परवा कोलंबोत क्रिकेटमधल्या पाकिस्तानी बाबरचं ‘पानिपत’ झालं. हिंदुस्थानी संघाने अगदी घसघशीत 228 धावांनी पराभव केला.

पावसाळी वातावरणामुळे बाबरने टॉस जिंकून हिंदुस्थानला फलंदाजी दिली आणि पराभवाची प्रस्तावना लिहिली. रोहित शर्माने पहिल्या षटकात अफ्रिदीला मारलेला फ्लिक षटकार हे हिंदुस्थानी विजयाचं पहिलं स्मितहास्य होतं. त्यानंतर यशाने पाकिस्तानकडे साधा कटाक्षसुद्धा टाकला नाही. दोन वर्षांपूर्वी दुबईत पाकिस्तानने हिंदुस्थानी आशा आकांक्षांवर जो नांगर फिरवला होता, त्याची बुलडोझर फिरवून हिंदुस्थानने पठाणी व्याजाने परतफेड केली.

अरे हो, शोएब अख्तर आम्ही तुझे आभारी आहोत. तू आमच्या स्वाभिमानाच्या शेपटीवर पाय ठेवला त्याचा केवढा फायदा झाला! हिंदुस्थानी संघातला दंश करणारा शेष जागा झाला आणि प्रत्येक खेळाडू डसला. आधीच्या सामन्यातला गिल आणि परवाचा गिल यात तरंग आणि समुद्री लाटेएवढा फरक होता. त्याने दर्जेदार आक्रमक हल्ला केला. रोहितने प्रेक्षणीय धुलाई केली. विराटने सवयीने शतक ठोकलं. सेट झाल्यावर शतकाकडे कसं कूच करावं या कलेचा पहिला क्लास हिंदुस्थानात सुनील गावसकरने काढला. तो पुढे सचिन तेंडुलकरने नेला. विराट त्याचं अधिक विकसित रूप दाखवतो आहे. त्याच्या शतकात फक्त 6 चौकार आणि 2 षटकार होते. म्हणजे त्याने किती धावा धाऊन काढल्या, हे गणित मांडा. त्याचा स्टॅमिना, त्याचं रनिंग बीटविन द विकेट्स याची कल्पना येते. मुख्य म्हणजे जोखीम कमी करून, चेंडू प्लेस करून, स्ट्राइक रेट कमी होऊ न देता, समोरच्या भागीदाराला सांभाळत शतक कसं ठोकतात याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं.

राहुल, त्याला अतोनात पाठिंबा देणारे त्याचे संघ व्यवस्थापनातील मित्र काल शांत झोपले असतील. तो फक्त सुनील शेट्टीचा जावई आहे, हा भ्रम त्याला व्यवस्थापनातून मिळणारा पाठिंबा पाहिला की दूर होतो. त्याच्याकडे जावई म्हणून प्रेमाने बघणारे अनेक आहेत. पण त्याने परवा अप्रतिम फलंदाजी केली.

पाच महिन्यांनंतर तो खेळत होता. त्या पाच महिन्यांत आधी त्याच ऑपरेशन झालं, मग त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न, मग फिजिओथेरपी, मग मानसिक ताण, तो या खेळीत सहीसलामत बाहेर आलेला दिसला. पहिल्या 25 धावांसाठी त्याने 47 चेंडू घेतले. नंतर 31 व्या षटकांत त्याने इफ्तेकारला स्क्वेअर लेगला षटकार स्वीप मारला. तिथून त्याने गियर बदलला. विराटने त्याला स्ट्राइक दिला. कोलंबोच्या दमट हवेत त्याची दमछाक झाली असेल. पाकिस्तानी डावात किशन पाच षटके यष्टिरक्षक झाला. मग भूमिका राहुलला दिली. पुन्हा एक अग्निपरीक्षा झाली.

पाकिस्तानी डावात मला आवडले, पहिले बुमरा आणि सिराजचे स्पेल्स. तो वेग, तो स्विंग, मुख्य म्हणजे तो टप्पा आणि दिशा. फलंदाजाच्या मुसक्या बांधून टाकणं म्हणजे काय असतं ते त्यांनी दाखवलं. ना पुढे जाता येतं, ना मागे ना मोठा फटका खेळता येत. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था. त्यांनी पाकिस्तानी फलंदाजाना बॅकफूटवर ठेवलं. कुलदीपने त्याच्या गोलंदाजीत जे तांत्रिक बदल केले, चेंडूचा वेग वाढवला, त्याचा फायदा दिसला. तो मॅचविनर ठरू शकतो. भुईसपाट झालेल्या पाकिस्तानी संघाला आता पुन्हा उद्घाटन करून नवीन पायाभरणी करायला हवी.