बाभळी आंदोलन: आंध्राच्या 3 माजी आमदारांना जामीन मंजुर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
law

सामना प्रतिनिधी । धर्माबाद

बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात 2010 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी धर्माबाद न्यायालयात उपस्थित असलेल्या तीन माजी आमदारांना आज जामीन मंजुर करण्यात आला.

धर्माबाद कनिष्ठ स्तर न्यायालयात सुनावणीच्या वेळी सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध 16 ऑगस्ट रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच 21 सप्टेंबर पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश बजावण्यात आले होते त्यानूसार आज या प्रकरणातील तीन माजी आमदार हजर झाले. जी.कमलाकर. टि.प्रकाश गौड व के.एस.रतनम अशी तीन माजी आमदारांची नावे असून तिघांनाही प्रत्येकी 15 हजारांच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

तसेच मागील अनेक तारखांना अनुपस्थित राहिल्याबदल प्रत्येकी 5 हजारांची दंडाची रक्कम भरणाही करण्यात आली. उर्वरीतांमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यासह इतर बारा जणांचा समावेश असून त्यांना 15 आक्टोंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील तारखेला माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उपस्थित राहतील अशी माहिती त्यांचे वकील सूबाराव यांनी दिली.

महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या पाणीवाटपावरून महाराष्ट्र सरकार व आंध्रप्रदेश सरकार यांमध्ये वाद निर्माण झाला होता. सन 2010 मध्ये धर्माबाद बाभळी बंधारा परिसरात जमावबंदीचा आदेश असताना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या तेलुगु देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी धर्माबाद येथे येत असतानाच आंध्र महाराष्ट्र सीमेवरच त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले होते.

त्याला न जुमानता चंद्राबाबू धर्माबादच्या दिशेने आपल्या कार्यकर्त्यांसह येत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे धर्माबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या पंधरा तत्कालिन आमदार व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

त्यानंतर केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने याबाबतीत लक्ष घालून चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांना नांदेड औरंगाबाद मार्गे हैदराबादला परत पाठवले.

सन 2010 मधील हे प्रकरण आता धर्माबाद कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला आले आहे, परंतु आतापर्यंतच्या सुनावणीत चंद्राबाबू नायडू यांच्यासह साथीदार कुणीही न्यायालयात उपस्थित झाले नव्हते. अखेर आज तीन माजी आमदार उपस्थीत झाले व न्यायालयाने सशर्त जामीनही दिला आहे. धर्माबाद न्यायालयाने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते तसेच या बाबत सर्वांना आतापर्यंत 30 वेळा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.

तत्कालीन परिस्थितीत चंद्रबाबू नायडू सोबत असलेले अनेक यापैकी काही जणआज त्यांच्या पक्षात नाहीत. तसेच पूर्वीच्या आंध्राप्रदेशाचे विभाजन झाले असून आता काहीजण आंध्र प्रदेशचे तर काहीजण तेलंगणा अशा दोन राज्याचे रहिवासी झाले आहेत. आज धर्माबाद च्या न्यायालयात माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उपस्थित राहतील म्हणून आंध्रा व तेलंगनाचा मीडिया प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. नायडू ऐवजी त्यांचे वकील सूबाराव यांनी न्यायालयात उपस्थित राहिले व पुढील तारखेला नायडू उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.