दंगल गर्ल झाली विवाहबद्ध, लग्नात दिला ‘बेटी बचाओ’चा संदेश

1416

हिंदुस्थानची दंगल गर्ल बबिता फोगट रविवारी विवाहबद्ध झाली. भारत केसरी विजेता पैलवान विवेक सुहागसोबत तिने लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे तिने या लग्नात सात ऐवजी आठ फेरे घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

बबिता आणि विवेक एकमेकांना पाच वर्षांपासून ओळखतात. दोघांची भेट दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना आपल्या नात्याविषयी कल्पना दिली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात त्यांचा विवाह निश्चित केला. रविवारी हरयाणातील बलाली या गावी बबिता आणि विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने पार पडला. या लग्नात फक्त 21 वऱ्हाडी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, इतर वेळी लग्नात सात फेरे घेतले जातात, मात्र इथे या दोघांनी आठ फेरे घेऊन आठव्या फेरा घेताना बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश दिला. हा विवाह खासगीत झाला असला, तरी सोमवारी सायंकाळी या विवाहाचा स्वागत सोहळा दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या