बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेग, भक्तांकडून होणाऱ्या अभिषेकाला मनाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाला भेग पडली आहे. आयआयटी मुंबईने तयार केलेल्या अहवालात हा खुलासा झाला आहे. यानंतर आता भक्तांकडून होणाऱ्या अभिषेकावर मंदिर समितीकडून निर्बंध लादण्यात आले आहेत.

बाबुलनाथ हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. सुमारे 350 वर्षांपूर्वी सोलंकी राजवंशातील राजांनी या मंदिराची निर्मिती केली. दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे. मुंबईकरांसह देशभरातील अनेक शिवभक्तांची रांग या मंदिरात नेहमी दिसते. या मंदिरातील शिवलिंगाला भेग पडल्याचं तेथील पुजाऱ्यांना लक्षात आलं. त्यानंतर आयआयटीकडे यामागील कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली.

आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानुसार, शिवलिंगावर दररोज वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक करण्यात येतो. यात अबीर, गुलाल, भस्म, कुंकू, चंदन, दूध आणि पाण्याचा समावेश आहे. यातील अनेक पदार्थांमुळे शिवलिंगाची झीज होत आहे. त्यामुळे ही भेग पडल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

शिवलिंगावर अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये दूध, पाणी, मध, दही, कुंकू, अबीर, भस्म, गुलाल, चंदन, फुलं, धोतरा, बेलपत्र आणि इतर अनेक पदार्थ वाहण्यात येतात. बाजारात मिळणारे बरेचसे पदार्थ हे भेसळयुक्त असतात. त्यामुळे ही भेग पडलेली असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाण्याव्यतिरिक्त अन्य सर्व पदार्थांच्या अभिषेकाला मनाई करण्यात आली आहे.