
राज्यातील शिंदे-फडणवीस (ईडी) सरकारचे समर्थक आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आपली भूमिका काय असेल, यावर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.
‘पहिल्यांदा चूक केली म्हणून माफ करतोय’ अशा शब्दांत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर मंगळवारी टीका केली होती. त्या टीकेला राणा यांनी आज प्रत्युत्तर दिले. ‘‘प्रेमाच्या भाषेवर एकदा नव्हे तर दहा वेळा माघार घेण्यास रवी राणा तयार आहे. पण कोणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमकही माझ्यात आहे,’’ असे रवी राणा म्हणाले.
राणा यांचे हे आव्हान स्वीकारताना बच्चू कडू यांनीही यावर ‘‘राणांनी तलवार घेऊन यावे, मी फुले घेऊन तयार राहतो. मंगळवारी मी माझ्या प्रहार संघटनेची भूमिका मांडली होती. कोणी निवडून यायचे हे जनता ठरवेल असे मी म्हटले होते. कुणाचेही नाव घेऊन बोललो नव्हतो. त्यामुळे राणांच्या बोलण्याची मी दखल घेत नाही,’’ अशी प्रतिक्रिया दिली. लवकरच आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची यासंदर्भात भेट घेणार असल्याचेही कडू यांनी सांगितले. या सर्व वादानंतर आगामी विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांची भूमिका नेमकी काय असणार, असा प्रश्न आता चर्चेत आहे.
त्यावर बच्चू कडू यांनीच भाष्य केलं आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना कडू म्हणाले की, राजकारणात सैनिकासारखं जगावं लागतं. आम्ही कोणत्या जागेवर उमेदवार उभे करणार हे अद्यापही ठरायचं आहे. त्या जागांचा शोध आम्ही घेणार आहोत. आमचा पक्ष लहान आहे, पैसे नाहीयेत, नेते नाहियेत. आम्ही कार्यकर्ते आहोत. याच कारणामुळे समोर काय रणनिती ठरवायची यावर अभ्यास करत आहोत. पूर्ण सहा महिने आम्ही हा अभ्यास करणार आहोत. 10 ते 15 जागा आम्ही निश्चित करून त्या जागांवर आम्ही लढणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.



























































