
लहान मुलांवर होणारे संस्कार त्यांचे व्यक्तीमत्त्व विकसीत करण्यात महत्त्वाचे ठरतात. तसेच या वयात चुकीच्या पद्धतीने त्यांना समजावल्यास त्यांच्यात नकारात्मकता किंवा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. आमची मुले कोणाचेही ऐकत नाही. दिवसभर त्रास देतात, अशी तक्रार अनेक पालक करतात. तर काही पालक मुलांना दमदाटी करत गप्प बसवतात. हे अयोग्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अशा पद्धतीने मुलांशी वागल्यास त्यांच्यावर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. अशा प्रकारे मुलांशी वागणे म्हणजे बॅड पॅरेंटिंग आहे. ते टाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
लहान मुलांशी नेमके कसे वागावे, हेच अनेक पालकांना समजत नाही. मुलांना नेहमी धाक दाखवणे, दमदाटी करणे, मारणे ही सर्व बॅड पॅरेंटिंगची लक्षणे आहेत. पालकांच्या अशा वागण्याने मुलांच्या मानसिक वाढीवर विपरीत परिणाम होतो. अनेक पालकांना बॅड पॅरेंटिंग आणि त्याच्या साइड इफेक्टची माहिती नसते. मात्र, अशा गोष्टी मुलांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करू शकतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मुलांनी शांत बसावे म्हणून त्यांना नेहमी दरडावणे, धाक दाखवणे मारणे योग्य नाही. लहान मुलांमध्ये विविध गोष्टींचे कुतुहल असते. वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची आणि करण्याची त्यांची ओढ असते. त्यामुळे दरडावून त्यांना गप्प करण्याने त्यांच्यातील कुतुहल शोधण्याची वृत्ती कमी होते. त्यामुळे मुलांना दरडावण्याऐवजी त्यांचे कुतुहल जाणून घेत त्याबाबत त्यांच्या शंकांचे समाधान करावे. त्यांना शांत बसवण्यासाठी धाक दाखवणे किंवा मारण्याऐवजी त्यांना पझल गेम किंवा इतर मानसिक क्षमता वाढवणारे खेळ आणून देत त्यात गुंतवावे.
आपल्या मुलांनी शिस्तप्रिय असावे, असे प्रत्येक पालकांना वाटते. त्यामुळे काही पालक मुलांना नेहमी शिस्तीचे धडे देत असे करू नये, तसे वागू नये, आम्ही सांगतो, तेच केले पाहिजे, अशी सक्ती मुलांवर करतात. त्याचेही विपरीत परिणाम मुलावर होतात. मुलांना शिस्त शिकवण्यासाठी त्यांना प्रेमाने समजवावे. त्यांच्या चुका दाखवून देतानाच त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करत त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. या कौतुकाने आणि प्रोत्साहनामुळे मुले चांगल्या गोष्टी स्वतःहून करतात. तसेच त्यांना प्रेमाने समजवल्याने पालकांमध्ये आणि मुलांध्ये भावनिक बंध तयार होतात. ते मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरतात.
मुलांसाठी नियमावली तयार करणे, त्यांची इतरांशी तुलना करणे, यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांची कुणाशिही तुलना करू नये. प्रत्येक मूल वेगळे असते. त्यांची आवड वेगवेगळी असते. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना प्रोत्साहन द्यावे. तसेच इतरांसमोर त्यांना दरडावणे, समजावणे यामुळे मुले समाजापासून दूर होतात. हे टाळणे गरजेचे आहे. समाजात कसे वावरावे, हे मुलांना योग्य प्रकारे समजवावे. तसेच त्यांना या गोष्टी सांगण्यापेक्षा आधी पालकांनी त्या अंमलात आणणे गरजेचे असते. मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे या गोष्टी शिकवण्याऐवजी मुले अनुकरणानेच त्या शिकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
काही पालक मुलांचे अतिलाड करतात. त्यांना सुरक्षितेतेसाठी बाहेर पाठवत नाहीत. मुले म्हणतील त्या गोष्टी त्यांना आणून देतात. हेदेखील एकप्रकारे बॅड पॅरेंटिंग असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या गोष्टींमुळे आपण जे मागू ते मिळालेच पाहिजे, अशी मुलांची धारणा होते आणि ते हट्टी होतात. त्यामुळे या गोष्टी टाळणेही गरजेचे असते. तसेच पालकांनी दिवसातून काहीवेळ फक्त मुलांसाठी काढणे गरजेचे आहे.
चांगेल पालक होणे म्हणजे मुलांचे सर्व लाड आणि हट्ट पुरवणे असा होत नाही. मुलांना त्यांच्या चुका शांतपणे समजावत, न ओरडता, न रागावता दाखवून द्याव्यात. तसेच त्यांचे हट्ट पुरवताना त्यांना पैशांचे महत्त्व कळेल, अशा प्रकारचे व्यवहार करावे. त्यांच्या अवास्तव मागण्या आणि हट्ट पुरवू नयेत. त्यांनी मागितलेली एखादी वस्तू आवाक्याबाहेरची असल्यास त्यांना जाणीव करून द्यावी. जंक फूड किंवा शीतपेय मुलांना आवडतात. त्यांना समजतील अशा पद्धतीने त्याचे दुष्परिणाम सांगावेत. तसेच लहान वयामुळे त्यांना या गोष्टी अपायकारक असल्याचे समजत नाही. त्यावेळी आठवड्यातील ठराविक दिवशी, ठराविक प्रमाणातच या गोष्टी मिळतील, असे त्यांना समजवावे.
मुलांवर कधीही हात उगारू नये. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देत, गरज असल्यास त्यांना शिक्षा जरूर करावी. मात्र, त्यांना शारीरिक शिक्षा करू नये. ते पुन्हा चूक करणार नाही. तसेच योग्य गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल, अशाच शिक्षा त्यांना कराव्या, असे तज्ज्ञांनी सांगितले.



























































