हिंदुस्थानच्या बॅडमिंटनमधील एक पर्व संपले, ज्येष्ठ खेळाडू नंदू नाटेकर यांचे निधन

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे बुधवारी सकाळी वृद्धपकाळाने पुण्यात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. बॅडमिंटनच्या माध्यमातून हिंदुस्थानात क्रीडा संस्कृती रुजविण्यात नाटेकर यांचे बहुमोल योगदान होते. हिंदुस्थानच्या बॅडमिंटनमधील एक पर्व अखेर आज संपले. नंदू नाटेकर यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. औंध येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. देशातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जागतिक बॅडमिंटनच्या नकाशावर नंदू नाटेकर यांच्या अलौकिक खेळामुळे हिंदुस्थानचे नाव चमकत राहिले. 1954मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 1956मध्ये मलेशियातील सेलंगर स्पर्धा जिंकणारे पहिले हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू होण्याचा मान नाटेकर यांना मिळाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेते पद पटकावणारे ते पहिले हिंदुस्थानी ठरले, हे विशेष. 1961मध्ये अमृतसर येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते ट्रिपल क्राऊन विजेते ठरले. ते सहा वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी विजेते पदाचे मानकरीही ठरले होते. पुरुषांच्या थॉमस कप स्पर्धेत 16 पैकी 12 एकेरी सामनेही त्यांनी जिंकण्याचा पराक्रम केला होता. थायलंड येथील खुल्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी विजय संपादन केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ बॅडमिंटनपटू, नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक नंदू नाटेकर यांनी उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली. तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू खेळाडूंसाठी ते आदर्श ठरले. त्यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. नाटेकर यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या चिरंतन स्मरणात राहील. महाराष्ट्र सुपुत्र, महान खेळाडू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

बॅडमिंटनला घरोघरी पोहचविण्यात मोलाचे योगदान

1950-60च्या दशकात हिंदुस्थानात सर्वदूर आणि घरोघरी बॅडमिंटन हा खेळ पोहचविण्यात नंदू नाटेकर यांच्या शैलीचा मोठा वाटा होता. कारकिर्दीतील त्यांचे हे सर्वात मोठे यश होय. नंदू नाटेकर यांच्या खेळातील प्रावीण्यामुळे त्या काळात संपूर्ण देशात जणू क्रीडा संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली व बॅडमिंटनबरोबरच अन्य खेळांचेही आकर्षण वाढून राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडत गेले. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानच्या बॅडमिंटन क्षेत्रातील एक पर्व संपले.

आपली प्रतिक्रिया द्या